सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : गतवर्षात हत्येच्या २४ घटना घडल्या असून, त्यामागे किरकोळ वादाचे कारण असल्याचे तपासात समोर आलेले आहे. यावरून वाढता मानसिक तणाव विकोपाला जाऊन, हत्या घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा घटनांना आवर घालण्याचे नवे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे.नवी मुंबईत (परिमंडळ एक) तीन वर्षांत एकूण ११५ हत्या झाल्या आहेत. २०१५मध्ये ४९, २०१६मध्ये ४२, तर २०१७मध्ये २४ हत्या झाल्या आहेत. मागील दोन वर्षांपेक्षा २०१७मध्ये हत्येच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. तर घडलेल्या गुन्ह्यांपैकी सर्वाधिक हत्या आपसातील किरकोळ वादातून घडल्या आहेत. गतवर्षात घडलेल्या २४ हत्यांपैकी २३ गुन्ह्यांची उकल पोलिसांनी अत्यंत शिताफीने केली आहे; परंतु उकल झालेल्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीतून घडलेल्या गुन्ह्यांऐवजी किरकोळ वादातून घडलेले गुन्हेच सर्वाधिक असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. यामुळे किरकोळ भांडणांचा वाढता तणाव विकोपाला जाऊन गुन्हे घडत असल्याचे दिसून येत आहे. कोणताही पूर्वनियोजित कट न रचता, रागाच्या भरात त्याचक्षणी हे गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये पती- पत्नीचे भांडण, व्यवसायातून झालेले किरकोळ वाद, अथवा पूर्ववैमनस्य अशा प्रमुख कारणांचा अधिक समावेश आहे. त्यापैकी पती-पत्नीतील वादाला, चारित्र्य संशयाचे कारण गंभीर ठरत आहे. पत्नीची एखाद्या पुरुषासोबत असलेली जवळीक, पतीच्या मनात निर्माण झालेला संशय वेळीच दूर न झाल्यास त्यांच्यात वाद होत आहेत, अशी काही प्रकरणे टोकाला जाण्यापूर्वी पोलिसांनी त्यांच्यातले गैरसमज दूर करण्याचीही भूमिकाही बजावलेली आहे; परंतु चर्चेतून प्रश्न मिटवण्याऐवजी संशय डोक्यातच ठेवल्याने वाद विकोपाला जात आहेत. अशाच प्रकारातून पतीने पाच महिन्यांच्या गरोदर पत्नीची हत्या केल्याचा गुन्हा २०१७च्या अखेरीस घडला होता. तर प्रेमसंबंधातून लग्नाला भाग पाडल्याने लग्नाच्या चौथ्या दिवशी तिची हत्या करून तुकडे केल्याचा प्रकार मुंबईत घडला होता. या गुन्ह्याची उकल नवी मुंबई पोलिसांनी रबाळे एमआयडीसी हद्दीत सापडलेल्या शिर नसलेल्या धडावरून केली होती. त्याशिवाय घणसोली गावामध्ये मटण विक्रेत्याकडे काम करणाºया तरुणाची हत्या, कोपरखैरणेतील फर्निचर व्यावसायिकाची हत्या, गोठीवली येथे पतीने केली पत्नीची हत्या, असे अनेक हत्येचे गुन्हे किरकोळ वादातून घडले आहेत.गोठीवली येथे घडलेला गुन्हा पती-पत्नीमधील सततच्या वादातून घडला होता. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाचा मनस्ताप असह्य झाल्याने पतीने तिची हत्या करून पळ काढला होता. हल्ली प्रत्येक जण नोकरी, व्यवसायातील स्पर्धेमुळे तणावग्रस्त जीवन जगत आहेत.
किरकोळ वादातून वाढल्या हत्या, वाढता तणाव जातोय विकोपाला; पोलिसांची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 1:07 AM