मराठी शाळांपुढे वाढती आव्हाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:33 AM2019-06-22T00:33:01+5:302019-06-22T00:33:12+5:30
मराठी शाळेपेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे दिवसेंदिवस पेव वाढत आहे
- अरुणकुमार मेहत्रे
मराठी शाळेपेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे दिवसेंदिवस पेव वाढत आहे. आज जरी मराठी शाळेचा हा टक्का वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय तरी मराठी शाळेमधील विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे. सरकारी पातळीवर मराठी हा विषय महाराष्ट्रात सर्व माध्यमांमध्ये प्राथमिक वर्गांपासून शिकवणे सक्तीचे करण्यासारखे उपाय केले जात आहेत.
एकंदरीत विद्यार्थ्यांच्या विचारांना शिक्षकांनी थोडीशी चालना दिली की ते भाषेच्या तासांमध्येही समरसून भाग घेऊ लागतात. त्याचबरोबर मराठीची गोडीही निर्माण होते. आता शिकवायच्या या पद्धती विद्यार्थीवर्गा प्रमाणेही बदलायला हव्यात. प्राथमिक स्तरावर काही प्रमाणात बालभारतीने पद्धती बदलण्याचा प्रयत्न केला. यंदा दुसरी इयत्तेचा अभ्यासक्रम बदलला खरा पण गणित विषयात मराठीची गळचेपी झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जुनी पद्धत डावलून नवीन पद्धतीचा अवलंब यात केला गेला असला तरी मुलांचा आकडेमोड करताना गोंधळ होताना दिसत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
आकलन क्षमता व घोकमपट्टीवर यांचा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. इंग्रजी पद्धतीनुसार मराठीचा वापर केला आहे. पण त्यास मराठी शिक्षक, तज्ज्ञांकडून नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे. सुशिक्षित पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना मूळ पाठ येतच असतो, त्याबद्दल सगळी माहिती त्यांनी आधीच करून घेतलेली असते. त्यामुळे पाठाशिवाय बऱ्याच बाकीच्या गोष्टीचींही त्यांना शिक्षकांकडून अपेक्षा असतात. जसे की लेखकाची पार्श्वभूमी, लेखकाचे बाकीचे लेखन, त्याच्या लेखनाची इतर वैशिष्ट्ये, त्या लेखनप्रकाराबद्दल अधिक माहिती वगैरे. परंतु अशिक्षित पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकातला पाठ हेच सर्व काही असते, कारण तो पाठ व्यवस्थित अभ्यासला तरच त्यांना परीक्षा उत्तीर्ण होता येणार असते आणि तीच त्यांची प्रमुख गरज असते. त्यामुळे इतर सर्व गोष्टींशी त्यांना काहीही देणेघेणे नसते.
विद्यार्थ्यांच्या मनात मराठी विषयाची आवड निर्माण होण्यामध्ये आणि टिकण्यामध्ये पाठ्यपुस्तकाचा आणि अभ्यासक्रमाचाही खूप मोठा वाटा असतो. यात आता शिक्षकांच्या शिकवणीची भर घातली जाते. संतकाव्य, कविता, सुलभ हाताळणीच्या कथा, प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांबद्दलचे पाठ, ललित लेख हे विद्यार्थ्यांना खूप आवडतात. हल्लीच्या धोरणानुसार ग्रामीण साहित्य काही टक्केतरी पुस्तकात असणे बंधनकारक आहे. परंतु एकंदरीत काही विशिष्ट इयत्तांपर्यंत विद्यार्थ्यांना हे साहित्य आवडत नाही असे दिसून येत आहे. तसेच क्लिष्ट भाषेतले, संस्कृत साहित्यही विद्यार्थ्यांना फारसे आवडत नाही. ‘व्याकरण’ हा प्रकारही विद्यार्थ्यांना खूप किचकट वाटतो. मराठीच नाही तर कुठलीही भाषा शिकताना व्याकरण हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पण तो ज्याप्रकारे शिकवला आणि तपासला जातो, ते विद्यार्थ्यांना आवडत नाही. या सगळ्या नावडत्या प्रकारांबद्दल आवड निर्माण करण्यासाठी शाळेत वेगवेगळे प्रकल्प राबवणे गरजेचे आहे. विद्यार्थी कुठलेही असोत, हल्ली त्यांचे अवांतर वाचन फारच कमी असते, ही मोठी अडचण आहे.
हल्ली मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची आणि इंग्रजी माध्यमात, तसेच महाविद्यालयात मराठी वैकल्पिक विषय घेणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. जग जवळ येत चाललं आहे तसं इंग्रजी आणि इतर परभाषा शिकण्याकडे सगळ्यांचाच कल वाढतो आहे.
प्रगतीच्या दृष्टीने इंग्रजी आवश्यक आहेच आणि तिला विरोध नाहीच, परंतु आपली मातृभाषा टिकवणे, तिचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. हल्लीच्या धोरणांनुसार प्रमाणभाषेपेक्षा बोलीभाषेला महत्त्व दिले जाऊ लागले आहे. मातृभाषेत व्यक्त होण्याच्या दृष्टीने हे अतिशय स्वागतार्ह असले, तरी भाषाशुद्धीकडे यामुळे दुर्लक्ष होत चालले आहे. शिवाय दृकश्राव्य माध्यमांच्या उदयामुळे नानाविध गोष्टी सगळ्यांच्याच नजरेला आणि कानावर पडत असतात.
कितीतरी वेळा तीन, चार भाषांची भेसळ एका वाक्यात ऐकायला मिळते. लहानपणापासून अशीच भाषा मुलांच्या कानावर पडायला लागली तर कुठलीच भाषा नीट त्यांना येणार नाही. सरकारी पातळीवर मराठी विषय पहिलीपासून ते शालान्त परीक्षेपर्यंत अनिवार्य करण्यासारखे उपाय योजले जात असतानाच आपणही सर्वांनी मराठी भाषा बोलून, वाचून, लिहून आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ती पोहोचवून आपला खारीचा वाटा उचलला तर आपली मातृभाषा उत्तरोत्तर समृद्ध होत जाईल, यात शंका नाही.