- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : शहरात वास्तव्याला असलेल्या विदेशी नागरिकांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढत चालली आहे. कपडा व्यवसायाच्या निमित्ताने शहरात स्थायिक झालेले बहुतांश विदेशी नागरिक अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. त्यात नायजेरियन व्यक्तींचा सर्वाधिक समावेश असून दलालांमार्फत जादा भाडे देवून त्यांच्याकडून भाड्याने घरे मिळवली जात आहेत.सुमारे ६ कोटी १२ लाख रुपये किमतीचे उच्च प्रतिचे कोकेन विक्रीसाठी घेवून आलेल्या विदेशी नागरिकाला मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तीन दिवसांपूर्वी अटक केली आहे. बोनाव्हेचूर एनझुवेचुक्कु एनवुडे (३५) असे त्याचे नाव असून तो मूळचा दक्षिण आफ्रिकेचा असून सध्या कोपरखैरणेत रहायला होता. त्याच्याकडे १ किलो २० ग्रॅम वजनाचे उच्च प्रतिचे कोकेन आढळून आले होते. हे कोकेन त्याने दक्षिण आफ्रिकेतील त्याच्या साथीदारामार्फत दिल्ली येथून मिळवल्याची कबुली त्याने दिलेली. यावरुन नवी मुंबईसह मुंबई परिसरात अमली पदार्थांच्या तस्करीत विदेशी नागरिकांचा विशेष सक्रिय सहभाग असल्याचे दिसून येत आहे. गत महिन्यात कोपरखैरणेतून फ्रिजार्डा अलबेर्टो बेदाने या मूळच्या मोझोम्बिकच्या महिलेला अटक करण्यात आली होती. तिच्याकडे ८५ लाख रुपये किमतीची एम.डी. पावडर जप्त करण्यात आली होती. सदर अमली पदार्थ विक्रीसाठी ती कोपरखैरणेत आली होती. चौकशीत ती कपड्याच्या व्यवसायाच्या बहाण्याने देशात प्रवेश मिळवून नवी मुंबईत वास्तव्य करत होती. तर दोन महिन्यांपूर्वी घणसोली येथून डायलो इलिआसु (३४) व मायकेल होप एनडीयु (२९) या दोघा विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे ४ लाख ३७ हजार रुपये किमतीची ८७ ग्रॅम मेथ्यॉक्युलॉन या अमली पदार्थाची पावडर आढळली होती.मागील काही वर्षात अशाच प्रकारे अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या अनेक विदेशी नागरिकांवर नवी मुंबई पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. त्यापैकी वाशी खाडीपुलालगतच्या एका कारवाईत एका नायजेरियन व्यक्तीने पोलिसांना मारहाण करत तिथल्या चौकीचीही तोडफोड केली होती. त्यानंतर कोपरखैरणे परिसरात मोठ्या प्रमाणात कोम्बिंग आॅपरेशन करुन नायजेरियन व्यक्तींची धरपकड करण्यात आली होती. मात्र मागील दोन वर्षात पुन्हा शहरात नायजेरियन व्यक्तींचे प्रमाण वाढल्याचे तसेच त्यांचा अमली पदार्थांच्या तस्करीत सक्रिय सहभाग असल्याचे दिसून आले आहे. यामुळे विदेशी नागरिक पोलिसांची डोकेदुखी ठरु लागले आहेत.>व्यवसायाच्या निमित्ताने देशात प्रवेशभारतातून कपडे खरेदी करून त्यांची आफ्रिकेच्या विविध भागात निर्यात करण्याच्या व्यवसायाच्या बहाण्याने नायजेरियन नागरिक भारतात प्रवेश मिळवत आहेत. मात्र देशात आल्यानंतर मुंबई अथवा नवी मुंबईत दलालामार्फत जादा रक्कम मोजून भाड्याने घरे मिळवली जात आहेत. त्यात गावठाण भागाचा सर्वाधिक समावेश आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडून कपड्याच्या व्यवसायाच्या आडून अमली पदार्थांची तस्करी केली जात आहे. याकरिता त्यांच्या वास्तव्याची नोंद पोलिसांपासून देखील लपवली जात आहे.>नायजेरियन व्यक्तींसाठी विशेष हॉटेल्सशहतातील नायजेरियन व्यक्तींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. याचा फायदा घेत काही हॉटेल व्यावसायिकांकडून त्यांच्यासाठी रात्रीच्या विशेष पार्ट्यांची सोय केली जात आहे. त्याठिकाणी अमली पदार्थांचा देखील वापर होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अशा पार्ट्यांमधून त्यांच्यात आपसात वाद झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तसा प्रकार काही वर्षांपूर्वी कोपरखैरणेत घडला देखील होता.
विदेशी नागरिकांची पोलिसांपुढे वाढती डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 11:54 PM