रोहा : तालुक्यातील तरुण पिढीला सध्या आॅनलाइन जुगाराचे वेड लागले असून, आपल्या मोबाइलवर तासन्तास तीनपत्ती नावाचा जुगार खेळण्यात सर्व तरुण मंडळी मग्न आहेत. तरुण वयात वाममार्ग स्वीकारणाऱ्या तरुणाईबद्दल समाजातून संताप व्यक्त होत आहे. तर पालक वर्गात संतापाचे वातावरण पसरले आहे.सध्या प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती मोबाइल वापरत असल्याचे दृश्य सर्वत्र दिसून येत आहे. संगणकीय युगात मोबाइलचा वापर करणे गरजेचे आहे; पण महत्त्वाच्या आणि गरजेच्या कामापेक्षा सध्याची तरुण पिढी मोबाइलचा दुरुपयोग करीत असल्याचे दृश्य सर्रासपणे दिसून येत आहे. या आॅनलाइन जुगाराचा काही मंडळींना या माध्यमातून मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे. या जुगाराच्या खेळात अर्थिक लाभ होत नसला, तरी आॅनलाइन पद्धतीने तुमच्या खात्यात पैसे जमा आहेत किंवा तुम्ही किती रुपये हरलात. हे मात्र स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य तरुण व्यक्ती बरोबर लक्ष्मीपुत्रही या आॅनलाइन जुगाराच्या फंदात अडकले आहेत. त्यातच रोहे शहरातील बहुतांश व्यापारी बांधवदेखील आॅनलाइन जुगाराच्या आहारी गेले आहेत. सकाळ, दुपार, रात्री-अपरात्री हे जुगाराचे खेळ मोबाइलवर सुरू असतात. मोबाइल कंपनीदेखील आपल्या ग्राहक वर्गाकडून आठवड्याकरिता विशिष्ट कर वसूल करीत आहे. एका आठवड्याकरिता ३५ ते ४० रुपये कर आकारणी केली जात असल्याने तरुण पिढी आॅनलाइन जुगारात खरेखुरे रुपये जिंकत किंवा हरत नसली, तरी मोबाइल कंपनी मात्र ग्राहकांच्या खिशावर लाखो रुपयांचा डल्ला मारत आहे. त्यातूनच मोबाइल कंपनी मालामाल, तर तरुण पिढी कंगाल अशीच काहीशी अवस्था निर्माण झाली आहे.यातून तरुण ज्येष्ठ लोक अक्षरश: बरबाद होत आहेत. अगदी खुलेआम सुरू असलेल्या आॅनलाइन जुगार कंपनीवर पोलिसांनी सक्त कारवाई करावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. (वार्ताहर)
रोह्यात आॅनलाइन जुगार तेजीत
By admin | Published: May 01, 2017 6:36 AM