‘तो’ भूखंड टाऊनशिपला देण्यास वाढता विरोध, राजकीय पक्षांची प्रस्ताव रद्दची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 09:57 AM2024-08-24T09:57:09+5:302024-08-24T10:00:02+5:30
शुक्रवारी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन त्यांना दिले.
नवी मुंबई : ऐरोलीमधील ३० हेक्टर क्षेत्रफळाचा भूखंड बड्या उद्योगपतीला टाऊनशिपसाठी देण्याच्या हालचाली सिडकोत सुरू असून, या प्रस्तावाला सिडको संचालक मंडळानेही मंजुरी दिल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सर्व क्षेत्रात त्याचे पडसाद उमटले. सिडको युनियनसह आता भाजप, काँग्रेससह उद्धवसेनेने हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन त्यांना दिले.
बड्या बिल्डर, उद्योजकांना कवडीमोल भावात भूखंड वाटले जात आहेत. प्रकल्पग्रस्तांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होत असल्याचे पक्षांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी उद्योगपतींच्या फायद्यासाठी केलेला हा व्यवहार रद्द करून प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडाचे वाटप करावे; अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत, नवी मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष संदेश बनसोडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव प्रणीत शेलार, जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष संतोष सुतार, आदी उपस्थित होते.
सिडको कार्यालयाबाहेर आंदोलन
उद्धवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वात नवी मुंबई, पनवेलमधील पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी बेलापूर येथील सिडको कार्यालयाबाहेर आंदोलन केले. विचारे यांनी शिष्टमंडळासह सिडको अधिकाऱ्यांची भेट घेतली. भाजपच्यावतीने नवी मुंबंई जिल्हा भाजपचे अध्यक्ष संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांनी तर शेकापकडून माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सिडकोच्या निर्णयास विरोध केला आहे.