गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र कायद्याची गरज
By admin | Published: August 18, 2015 03:04 AM2015-08-18T03:04:18+5:302015-08-18T03:04:18+5:30
गृहनिर्माण संस्थांना कोणतेही उत्पन्न नसल्यामुळे या संस्थांसाठी स्वतंत्र सहकार कायदा असावा, अशी मागणी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष
ठाणे : गृहनिर्माण संस्थांना कोणतेही उत्पन्न नसल्यामुळे या संस्थांसाठी स्वतंत्र सहकार कायदा असावा, अशी मागणी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष सीताराम राणे यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या फेडरेशनच्या निवडणुकीत त्यांचे संपूर्ण पॅनल निवडून आले. या संचालकांच्या बैठकीत त्यांची पुन्हा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. मानद सचिव म्हणून शशिकांत मोरे तर कोषाध्यक्ष म्हणून निम्बा पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली. गृहनिर्माण संस्थांच्या बिनभोगवटा शुल्कामध्ये वाढ करण्यासाठी आपला प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे गृहनिर्माण संस्थांचे वाद मिटविण्यासाठी लवाद नेमला जावा, यासाठीही पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुनर्विकास करताना ३० टक्के सभासदांच्या निष्कासनाची तरतूद सहकार कायद्यात करावी, गृहनिर्माण संस्थांच्या लेखापरीक्षणाची यादी जिल्हा आणि राज्यस्तरीय संघीय संस्थांकडे देण्यासाठी प्रयत्न, ३० वर्षांपेक्षा जुन्या गृहनिर्माण संस्थांना वाढीव चटईक्षेत्र मिळावे, त्याचप्रमाणे गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी हे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे अशा पदाधिकाऱ्यांना निवडणुकांच्या कामातून मुक्त करावे असे त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)