भारत मैत्री अभियान अलिबागमध्ये
By Admin | Published: February 4, 2016 02:39 AM2016-02-04T02:39:23+5:302016-02-04T02:39:23+5:30
उडुपीमधील कुंदापूर तालुक्यातील बसरुरमधील पोर्तुगीज-डचांची पाशवी सत्ता समूळ उखडून काढून, त्या सुभ्यास स्वातंत्र्य बहाल केले.
अलिबाग : उडुपीमधील कुंदापूर तालुक्यातील बसरुरमधील पोर्तुगीज-डचांची पाशवी सत्ता समूळ उखडून काढून, त्या सुभ्यास स्वातंत्र्य बहाल केले. श्री शिवप्रभूंच्या सागरी पराक्रमाच्या या तेजस्वी घटनेस येत्या ८ फेब्रुवारी २०१६ ला ३५१ वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक घटनेचा विजयोत्सव व सागरी सीमांचे संरक्षण करण्याचा संकल्प करुन सशक्त भारत निर्माणाकरिता शिवप्रेमी व शिव इतिहास समविचारींनी आयोजित केलेल्या ३ हजार ४१८ किमी प्रवासाच्या ‘तटीय भारत मैत्री अभियाना’चे बुधवारी सकाळी १० वाजता अलिबागमध्ये आगमन झाले. त्यावेळी सरखेल वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी या अभियानाचे स्वागत केले.
श्री शिवप्रभूंनी सिंधुदुर्ग (मालंडची खाडी) ते उडुपीतील बसरुर अशी ही धाडसी आरमार मोहीम ३५१ वर्षांपूर्वी यशस्वी करुन सागरी सीमा सुरक्षेचा पहिला वस्तुपाठ घालून दिला होता. आजच्या या अभियानास आगळे महत्त्व असल्याचे या मोहिमेच्या आयोजनात सक्रिय सहभागी झालेले सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी सांगितले.
‘तटीय भारत मैत्री अभियाना’चे मोहीम प्रमुख इतिहास अभ्यासक संदीप महिंद यांच्या नेतृत्वाखाली ९८ शिवप्रेमी युवक-युवती मोटरसायकल व अन्य वाहनांच्या माध्यमातून या मोहिमेत सहभागी झाले आहेत.