भारतीय आंबा जगात भारी! मुंबईतून अमेरिकेला ५६७ टन निर्यात, ४० पेक्षा जास्त देशांना लागली गोडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 07:09 AM2023-05-27T07:09:14+5:302023-05-27T07:10:07+5:30
फळांच्या राजाची चव जगभरातील ग्राहकांना आवडू लागली आहे. भारतामधील विविध शहरांमधून प्रत्येक वर्षी आंबा निर्यात केला जात आहे.
- नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : भारतीय आंब्याला जगभरातून मागणी वाढत आहे. यावर्षीही ४० पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केली जात आहे. पणन मंडळाच्या नवी मुंबईमधील केंद्रातून आतापर्यंत अमेरिकेला ५६७ टन निर्यात झाली आहे. यूकेला १,०६१ टन व जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरियासह युरोपभर आंबे पाठविले जात असून यासाठी विशेष निर्जंतुकीकरण प्रकल्पही उभारला आहे.
फळांच्या राजाची चव जगभरातील ग्राहकांना आवडू लागली आहे. भारतामधील विविध शहरांमधून प्रत्येक वर्षी आंबा निर्यात केला जात आहे. २०२२ - २३ मध्ये २२,९६३ टन आंब्याची ४० पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात झाली होती. आंबा निर्यातीमधून ३७८ कोटी रुपयांची उलाढाल झाली हाेती. अमेरिका, युरोप, युके व इतर काही देशांमध्ये निर्यात करताना आंब्यावर निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया करावी लागते. यासाठी नवी मुंबई, लासलगाव, अहमदाबाद व बेंगळूरू येथे विशेष निर्यात सुविधा केंद्र सुरू केली आहेत.
भारतीय आंब्याला अमेरिकेमध्येही मागणी वाढत आहे. २०२० - २१ मध्ये फक्त १.४५ टन आंबा अमेरिकेला निर्यात केला होता. २०२२ - २३ मध्ये हा अकडा ८१३ टन झाला आहे. यावर्षी फक्त नवी मुंबईच्या केंद्रातून आतापर्यंत ५६७ टन आंबा निर्यात झाला आहे. आतापर्यंत आस्ट्रेलियाला १६.५४ टन, युकेला १०६१ टन, युरोपीय देशांमध्ये ९२ टन, जपान, दक्षिण कोरिया, न्यूझीलंडमध्ये ५४.५ टन आंबा पणन मंडळाच्या केंद्रातून निर्यात केला जात आहे. पणन संचालक सुधीर तुंगार व इतर अधिकाऱ्यांनी निर्यात वृद्धीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
अमेरिका, युरोपियन देशांसह विविध देशांमध्ये आंबा निर्यात केला जात आहे. प्रत्येक देशाच्या नियमावलींचे पालन करून व आवश्यक ती निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया करून आंबा निर्यात केला जात आहे. आंब्यावर व्हॉट वॉटर व व्हीएचटी ट्रिटमेंट केली जाते.
- सतीश वाघमोडे,
सह-सरव्यवस्थापक, निर्यात सुविधा केंद्र