लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुसळधार पावसामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने १७ सप्टेंबरला आयोजीत केलेली इंडियन स्वच्छता लीग रद्द केली आहे. नेरूळमधील गणपतशेठ तांडेल मैदानात १७ सप्टेंबरला हा उपक्रम राबविण्यात येणार होता. यामध्ये २५० पेक्षा जास्त शाळांमधील ५० हजार पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होणार हाेते.
नवी मुंबई परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील दोन दिवस अतीवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे महानगरपालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत होणारे कार्यक्रम पुढे ढकललले आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने शनिवारी नेरूळ सेक्टर २६ मधील गणपतशेठ तांडेल मैदानात सकाळी ८ ते ११ दरम्यान विशेष कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमात शहरातील २५० पेक्षा जास्त शाळांमधील ५० हजार पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित राहून स्वच्छतेविषयी जनजागृती करणार होते. विद्यार्थ्यांची वेशभुषा, घोषवाक्ये व इतर कल्पक प्रदर्शनाप्रमाणे त्यांना पारितोषीके साजरी केली जाणार होती. इंडियन स्वच्छता लीगमधील कार्यक्रमांचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. या लीगसाठी mygov पोर्टलवर करावयाचे रजिस्ट्रेशन सुरू असून जास्तीत जास्त नागरिकांनी रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.