इंडियन वॉटर वर्क्सचे अधिवेशन
By admin | Published: January 21, 2016 02:52 AM2016-01-21T02:52:30+5:302016-01-21T02:52:30+5:30
पाणीपुरवठा, जलशुद्धीकरण आणि सांडपाण्याचे निस्सारण आदि क्षेत्रात कार्यरत असलेल्या इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनचे ४२ व्या तीन
नवी मुंबई : पाणीपुरवठा, जलशुद्धीकरण आणि सांडपाण्याचे निस्सारण आदि क्षेत्रात कार्यरत असलेल्या इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनचे ४२ व्या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनास गुरुवार २१ जानेवारीपासून वाशी येथे सुरुवात होत आहे. केंद्र सरकारचे स्वच्छ भारत अभियान डोळ्यासमोर ठेवून पाणी व स्वच्छता सर्वांसाठी हे ब्रीदवाक्य तयार करण्यात आल्याचे असोसिएशनच्या मुंबई केंद्राचे चेअरमन डॉ. हेमंत लांडगे यांनी पत्रकारांना सांगितले.
राज्य शासनच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत पाणी आणि स्वच्छतेबाबत अनेक योजना तयार करून त्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच युनिसेफसारख्या संस्थेची मदत व सहभाग घेण्यात येतो. सध्या केंद्र सरकारनेस्वच्छतेस अधिक महत्त्व दिले असल्याने शहरातील झोपडपट्टी भागाबरोबरच राज्यातील ग्रामीण भाग व गाव खेडे हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी स्वतंत्र शौचालय बांधण्यासाठी शासनातर्फे १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. हे अनुदान मिळविण्यासाठी नागरिकांनी स्वखर्चाने शौचालय बांधल्यानंतर शासन त्याला अनुदान देत असल्याचे राज्य शासनाच्या पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेचे संचालक बी. के. सवाई यांनी सांगितले.
गुरुवार २१ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे संपन्न होणारे हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, युनिसेफ व सिडको यांच्यातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. या अधिवेशनात देशातील विविध राज्यातील पाणीपुरवठा व स्वच्छता विषयावर काम करणारे सुमारे ७०० इंजिनिअर व तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचे उद्घाटन पाणीपुरवठा विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच पाणीपुरवठा स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य हे उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनात पाणीपुरवठा व स्वच्छतेशी निगडित नवीन तंत्रज्ञान, अत्याधुनिक यंत्रसामग्री, पाइप्स, व्हॉल्व यांचे प्रदर्शन उभारण्यात येणार असून या विविध शासकीय ६९ संस्था, उत्पादक व अशासकीय संस्थांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर युनिसेफ देखील १० स्टॉलच्या माध्यमातून पाणी व स्वच्छता क्षेत्रातील नावीन्यपूर्ण, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देणार आहे. या अधिवेशनात पाणी व स्वच्छता या ब्रीद वाक्यावर आधारित विषयावर तज्ज्ञांकडून पेपर्स मागविण्यात आले होते. यातील निवडक २० पेपर्स ६ भागात या क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुमती व्यवसायिक सादर करणार असल्याची माहिती डॉ. हेमंत लांडगे यांनी दिली. (प्रतिनिधी)