भारतातील पहिलाच प्रोटोन बीम उत्पादन प्रकल्प पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 03:28 AM2020-08-16T03:28:58+5:302020-08-16T03:29:03+5:30

सध्याच्या घडीला ट्रीटमेंट रूमचे काम सुरू आहे.

India's first proton beam manufacturing project completed | भारतातील पहिलाच प्रोटोन बीम उत्पादन प्रकल्प पूर्ण

भारतातील पहिलाच प्रोटोन बीम उत्पादन प्रकल्प पूर्ण

Next

वैभव गायकर 
पनवेल : देशात कर्क रोगावर आधुनिक पद्धतीची उच्च तंत्रज्ञानाची प्रोटोन थेरपी लवकरच खारघरमधील टाटा एक्ट्रेक सेंटरमध्ये सुरू होणार आहे. भारतात प्रथमच अशा प्रकारची आधुनिक उपचार पद्धती वापरली जाणार असल्याने, दरवर्षी हजारो कर्करुग्णांना या थेरेपीद्वारे जीवनदान मिळणार आहे. भारत सरकारच्या परमाणू ऊर्जा विभागाच्या मदतीने ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. बेल्जियम स्थित आयबीए कंपनीमार्फत संबंधित यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण वेगात सुरू असून, दोन टप्पे पूर्ण झाले. संबंधित यंत्रणा लवकरच कार्यान्वित होणार आहे. सध्याच्या घडीला ट्रीटमेंट रूमचे काम सुरू आहे.
२९ जानेवारी रोजी संबंधित यंत्रणा टाटा एक्ट्रेक सेंटर येथे आणण्यात आली. यानंतर ३१ जुलै रोजी दुसऱ्या टप्प्यात संबंधित यंत्रणा पूर्णपणे बसविण्यात आली आहे. सुमारे ६५ हजार स्क्वेअर फूट या जागेवर प्रोटोन थेरेपीची स्वतंत्र इमारत उभारण्यात आली आहे. या ठिकाणी प्रोटोन थेरपी यंत्रणा, तसेच तीन ट्रीटमेंट रूम असणार आहेत. या व्यतिरिक्त या इमारतीमध्ये डॉक्टर्स रूम, लहान मुलांसाठी वेटिंग रूम्स, सिटी स्कॅन रूम आदींचा समावेश आहे. पेन्सिल बीम स्कॅनिंग ही या प्रोटोन थेरेपीची विशेषत: आहे. सुमारे २० ते ४५ दिवसांत अवघ्या १५ मिनिटांत रुग्णावर ही थेरेपी वापरली जाणार आहे. प्रोटोन थेरेपी ही कर्करुग्णांना दिली जाणारी सर्वात महागडी अशी उपचार पद्धती आहे. कर्करुग्णांच्या पेशींना नष्ट करण्यासाठी रेडिएशन दिले जाते. परंपरागत चालत आलेल्या रेडिएशनच्या उपचार पद्धतीत कर्करुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रोगी पेशींसह निरोगी पेशीही यामुळे मृत पावत असल्याने, कर्क रुग्णांवर घातक परिणाम होतो. यावेळी अनेक रुग्णांचे केसदेखील गळत असतात. मात्र, नव्याने अवगत झालेल्या प्रोटोन थेरपीमुळे रुग्णांना होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. बेल्जियम देशातील आयबीए कंपनीने ही यंत्रणा विकसित केली आहे.
वर्षभरात सुमारे ८०० ते ९०० कर्क रुग्णावर या थेरेपीद्वारे उपचार केले जाणार आहेत. याकरिता संबंधित यंत्रणा कार्यान्वित करण्याची जबाबदारी एक्ट्रेक टीएमसीच्या डॉक्टर, अभियंते आणि आयबीएच्या तंत्रज्ञांवर असणार आहे. टीएमसीचे संचालक डॉ.राजेंद्र बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक डॉ.सिद्धार्थ लस्कर, टाटा एक्ट्रेकचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता व आयबीएचे संचालक राकेश पाठक आदी मेहनत घेत आहेत.
>जगभरातील महागडी उपचार पद्धती
अमेरिकेत याच थेरपीसाठी किमान ७० लाख रुपये मोजावे लागतात. भारत सरकारच्या परमाणू ऊर्जा विभागाच्या मदतीने ही यंत्रणा खारघर टाटा रुग्णालयात उभारण्यात येत आहे. वर्षभरात उपचार करण्यात येणाºया ९०० रुग्णांपैकी ६० टक्के रुग्णांवर या ठिकाणी मोफत उपचार केले जाणार आहेत. गरीब व गरजूंना या ६० टक्क्यांमध्ये प्राधान्य असणार आहे. पुढील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत प्रोटोन थेरेपी या ठिकाणी सुरू होणार आहे, अशी माहिती डॉ.सिद्धार्थ लस्कर यांनी दिली.

Web Title: India's first proton beam manufacturing project completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.