सलग ७९२ तास गायनाचा विश्वविक्रम भारताच्या नावावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 01:37 PM2019-12-18T13:37:03+5:302019-12-18T14:42:58+5:30
विराग मधुमालती ग्रुपच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन १५ नोव्हेंबर ते २२ डिसेंबरदरम्यान करण्यात आले आहे.
- वैभव गायकर
पनवेल : राष्ट्रीय एकात्मतेसाठी बेटी बचाव बेटी पढाव, स्टॉप ग्लोबल वार्मिंग, कैपस विथ हेल्मेट, सेव्ह वॉटर,रक्त दान या सामाजिक विषयांच्या प्रचार व प्रसारासाठी खारघर शहरातील लिटलवर्ल्ड मॉलमध्ये हा उपक्रम साकारला जात आहे. सलग गायनाच्या चीनच्या ७९२ तासांचा विक्रम मोडीत काढून भारताच्या नावावर या विश्वविक्रमाची नोंद १८ डिसेंबरला दुपारी १ वाजून 21 मिनिटांनी झाली. या विक्रमाची नोंद गिनीज बुक वर्ल्ड रोकॉर्ड मध्ये करण्यात आली. सुमारे ८०० पेक्षा जास्त गायकांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला.
विराग मधुमालती ग्रुपच्या माध्यमातुन या उपक्रमाचे आयोजन १५ नोव्हेंबर ते २२ डिसेंबरदरम्यान करण्यात आले आहे. या उपक्रमात देशभरातील विविध कानाकोप-यातील गायक, संगीतप्रेमी सहभागी होत आहेत. यामध्ये देशभरातील विविध राज्यातील गायकांनी सहभाग घेतला. यामध्ये दिल्ली, केरळ, चेन्नई, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, ओरिसा, पुणे, गुजरात,राजस्थान आदींसह वेगवगेळ्या ठिकाणच्या संगीतप्रेमींनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला आहे.
या उपक्रमात ११०० पेक्षा जास्त गायक सहभागी होणार आहेत. यामध्ये मराठी, हिंदीसह विविध प्रादेशिक भाषांचा संगीत गितांचा सहभाग आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आजतागायत सलग ७९२ तास गायनाच्या विक्रमाची नोंद चीन देशाच्या नावावर होता. या उपक्रमात सहभागी झालेल्या गायकावर नजर ठेवण्यासाठी ४ कॅमेरे तसेच प्रत्येक सेकंदाची नोंद करण्यासाठी निरीक्षक याठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत.
या उपक्रमाअंतर्गत बेटी बचाव बेटी पढाव, स्टॉप ग्लोबल वार्मिंग, कैपस विथ हेल्मेट, सेव्ह वॉटर, रक्त दान यासंदर्भात देखील जनजागृती केली जात आहे. त्यानुसार मंचावर या विषयावरील जनजागृतीचे पोस्टर लावले जात आहेत. या उपक्रमाचे आयोजक विराग मधुमालती यांच्या नावावर आजतागायत सुमारे चार जागतिक विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली आहे. हे विक्रम राष्ट्रीय एकात्मता व नेत्रदान जनजागृतीसाठी समर्पित करण्यात आले आहेत. या उपक्रमाला आपला पाठिंबा देण्यासाठी विविध क्षेत्रातील नामांकित मंडळी याठिकाणी भेट देत आहे.