उद्घोषणा होत नसल्याने संतापात भर; हार्बरवर सिग्नल यंत्रणेत बिघाड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 07:21 AM2022-12-16T07:21:20+5:302022-12-16T07:21:41+5:30
ऑफिस गाठण्यासाठी करावी लागली कसरत
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून पहाटेपासून लोकल उशिराने धावत असल्याच्या तक्रारी असताना गुरुवारी हार्बर मार्गावरही जुईनगर रेल्वेस्थानकांत सिग्नल बिघाडामुळे ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावरील रेल्वेप्रवाशांचे प्रचंड हाल झाले. लोकल का उशिराने धावत आहेत, का खोळंबल्या आहेत, याचे उत्तर उशिरापर्यंत न मिळाल्याने प्रवाशांच्या संतापात अधिकच भर पडली.
ट्रान्स हार्बरलाही फटका
जुईनगर रेल्वेस्थानकाजवळ गुरुवारी सकाळी सिग्नल यंत्रणेत अचानक बिघाड झाला. परिणामी सीएसएमटीहून पनवेल-नवी मुंबईकडे ये-जा करणाऱ्या लोकलसह ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी-पनवेल लोकलसेवाही विस्कळीत झाली. यामुळे दोन्ही मार्गांवर ये-जा करणारे चाकरमानी, विद्यार्थी यांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. अनेकांना लेटमार्कला सामोरे जावे लागले.
पनवेल लोकल चारदा खोळंबली
गुरुवारी सकाळी ठाण्याहून पनवेलकडे जाणारी एक लोकल एक नव्हे, दोन नव्हे तर चार वेळा चार ठिकाणी खोळंबली. हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून रोज सकाळी पनवेल लोकललाच होत असल्याचे दैनंदिन प्रवास करणाऱ्या एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याने सांगितले. लोकलमध्ये उद्घोषणेची सोय नसल्याने लोकल खोळंबा का हाेत आहे, हे कळत नाही. यामुळे मात्र कॉलेजमध्ये जायला रोज उशीर हाेत असल्याचे या विद्यार्थ्याने सांगितले. सध्या परीक्षा सुरू असल्याने टेन्शन वाढत असल्याचे तो म्हणाला.
लोकलमध्ये चढण्यासाठी झुंबड
सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील सर्वच स्थानकांत प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. यामुळे वृद्धांसह लहान मुलांचे हाल झाले. वाहतूक सुरू झाल्यानंतरही लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाल्याने अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागले.