नवी मुंबई : अज्ञात व्यक्तीकडे माचीस मागून त्याने न दिल्याने झालेल्या वादातून हत्येच्या घटनेचा उलगडा तुर्भे एमआयइसी पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून तो इंदिरानगर परिसरात राहणारा आहे. बेवारस आढळलेल्या मृतदेहावरून पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे.
इंदिरानगर परिसरात रस्त्यालगत एक वयस्कर व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली होती. परिसरातील नागरिकांमार्फत तुर्भे एमआयडीसी पोलिसांना त्याची माहिती मिळताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या डोक्यावर गंभीर घाव घालून हत्या करण्यात आली होती. तर घाव इतके जोरदार होते कि त्यांची डोक्याची कवटी फुटली होती. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने त्यांची हत्या केल्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाला सुरवात केली होती. यासाठी वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी विविध पथके तयार केली होती. त्यामध्ये तांत्रिक तपासात एकाची माहिती मिळाली असता, चौकशीसाठी त्याला ताब्यात घेताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
नहीम अन्सारी (२३) असे मारेकरुचे नाव असून तो तुर्भे एमआयडीसी परिसरात राहणारा आहे. तर मयत प्रसाद खडका (५३) हे सानपाडा येथे राहणारे असून तुर्भे एमआयडीसीत नोकरीला आहेत. ते रस्त्याने चालत घराकडे जात असताना नहीम याने त्यांना अडवून त्यांच्याकडे सिगारेट पेटवण्यासाठी माचीस मागितले होते. परंतु प्रसाद यांनी आपल्याकडे माचीस नसल्याचे सांगितले असता यावरून त्यांच्यात वाद झाला होता. यावेळी राग अनावर झालेल्या नहीम याने रस्त्यालगतच्या दगडाने प्रसाद यांच्या डोक्यावर गंभीर वार केले असता त्यात ते जखमी होऊन मृत पावले. याप्रकरणी नहीम अन्सारी याला अटक करण्यात आली आहे.