इंदिरानगर, चिंचपाड्यात सर्वात कमी रुग्ण; तीन ते चार रुग्ण शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 01:09 AM2020-12-16T01:09:56+5:302020-12-16T01:10:21+5:30
संसर्ग कमी होण्यात नागरी आरोग्य केंद्रांचा महत्त्वाचा वाटा
- नामदेव मोरे
नवी मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश येऊ लागले आहे. शहरातील रुग्ण संख्या कमी होत असून, इंदिरानगर परिसरात फक्त एकच रुग्ण शिल्लक आहे. चिंचपाडामध्ये ३ व कातकरी पाडा परिसरात फक्त ४ रुग्ण शिल्लक आहेत. महामारी रोखण्यामध्ये नागरी आरोग्य केंद्रांचा वाटा महत्त्वाचा असून, तेथील डॉक्टर व कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.
दिवाळीनंतर नवी मुंबईमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले होते. दुसरी लाट अधिक धाेकादायक ठरणार असल्याचे बोलले जाऊ लागले होते. यामुळे शहरवासीयांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी तत्काळ जनजागृती व उपाययोजनांमध्ये वाढ केली. चाचण्यांचे प्रमाण वाढविले. नागरी आरोग्य केंद्रांवर विशेष जबाबदारी देण्यात आली होती. नागरी आरोग्य केंद्रातील डाॅक्टर्स व इतर सर्व कर्मचारी मार्चपासूनच प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. दिवाळीनंतर आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून कामकाजाला पुन्हा गती देण्यात आली. रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत पोहोचणे त्यांची चाचणी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. या सर्व उपाययोजनांमुळे प्रत्येक नोडमधील रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. इंदिरानगर परिसरात सद्यस्थितीमध्ये फक्त १ रुग्ण शिल्लक आहे. चिंचपाडा परिसरात ३ व कातकरीपाडामध्ये ४ रुग्ण शिल्लक आहेत. पुढील काही दिवसांत हा परिसर पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईमध्ये मार्चपासून ४७,४२७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सर्वाधिक ४,११६ रुग्ण घणसोली नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरातील बरे झाले आहेत. खैरणेमध्ये ३,९८४, रबाळेमध्ये ३,२३६, सानपाडामध्ये ३,४१४ जण बरे झाले आहेत. चिंचपाडामध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के, घणसोलीमध्य, कातकरीपाड, खैरणे व कुकशेतमध्ये हे प्रमाण ९६ टक्केपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले. मृत्युदर २ टक्क्यांवर रोखण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. आतापर्यंत सर्वाधिक ७३ जणांचा महापेमध्ये मृत्यू झाला आहे. घणसोली व रबाळे नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरात ७१, खैरणेमध्ये ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. शिल्लक रुग्णांची संख्या संपूर्ण शहरात कमी होऊ लागल्याने दिलासा मिळू लागला आहे.
आरोग्य केंद्र शिल्लक रुग्ण मृत्यू कोरोनामुक्त
ऐरोली ६३ ७० २६६४
सीबीडी ८७ ५३ २९५१
चिंचपाडा ३ ८ ३६६
दिघा २१ ३५ ११६०
घणसोली ६४ ७१ ४११६
इलठाणपाडा १२ २२ ४७९
इंदिरानगर १ १३ २०२
जुहूगाव ९६ ६० २९२६
करावे ११४ ५७ २७३६
कातकरीपाडा ४ ९ ३३८
खैरणे ५३ ७२ ३९८४
कुकशेत ६० ३६ २३२६
आरोग्य केंद्र शिल्लक रुग्ण मृत्यू कोरोनामुक्त
महापे ५६ ७३ २३३९
नेरुळ एक ५० ३८ २०७०
नेरुळ दोन २६ ३२ १५४९
नोसील नाका १४ २८ ११६६
पावणे ४६ ३३ १५६४
रबाळे ११४ ७१ ३२३६
सानपाडा ९७ ६० ३४१४
सेक्टर ४८ सीवूड ६८ ३९ १९७१
शिरवणे ८० ४४ २४६८
तुर्भे १८ ४८ ११७१
वाशीगाव ६४ ४३ २१३१