लोकमत न्यूज नेटवर्क पनवेल : जन्मजात हृदयरोग असलेल्या गरीब मुलांना शस्त्रक्रिया परवडणारी नसते. त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागतात. अशा मुलांच्या उपचाराकरिता निधी उपलब्ध करून देण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तींनी अशा उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याची गरज असल्याचे मत क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी मांडले. द्विशतक केल्यावर जसा आनंद होतो, त्याहून ज्या बालकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाल्या त्या पालक आणि बालकांचा आनंदमयी चेहरा पाहून होत गावसकर यांनी सांगितले.
कोविड काळात हृदयविकाराने त्रस्त असणाऱ्या १५० मुलांवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया खारघर येथील श्री सत्यसाई संजीवनी रुग्णालयात करण्यात आल्या. यासंदर्भात माहिती देण्यासाठी बुधवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गावस्कर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर श्री सत्यसाई हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष सी. श्रीनिवासन, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टचे जिल्हा गव्हर्नर सुनील मेहरा,अध्यक्ष नितीन मेहता आदी उपस्थित होते. यावेळी शस्त्रक्रिया झालेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांचा क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या शस्त्रक्रियेसाठी रोटरी क्लब बॉम्बे एअरपोर्ट यांच्या वतीने दोन कोटी १७ लाख रुपये अर्थसाहाय्य करण्यात आले. त्यामुळे मुलांना एक नवीन आयुष्य मिळाले. ज्या बालकांना हृदयविकाराचा आजार असेल अशा पालकांनी रोटरी क्लब बॉम्बे एअरपोर्टला संपर्क साधल्यास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टचे जिल्हा गव्हर्नर सुनील मेहरा यांनी यावेळी सांगितले.
ऑगस्ट ते जानेवारी दरम्यान ६८ मुलांवर शस्त्रक्रिया पार पडल्या. मे महिन्यापर्यंत शंभर बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, येत्या वर्षात ७५० बालकांची शस्त्रक्रिया करण्याचा मानस आहे.- सी. श्रीनिवासन, अध्यक्ष, श्री सत्य साई हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्ट,