महाडमध्ये औद्योगिक वसाहतीत प्रदूषण जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 03:19 AM2018-10-03T03:19:50+5:302018-10-03T03:20:27+5:30

प्रदूषण मंडळाचे मौन : कंपन्यांकडून नोटिसीला केराची टोपली

Industrial estates were like pollution in Mahad | महाडमध्ये औद्योगिक वसाहतीत प्रदूषण जैसे थे

महाडमध्ये औद्योगिक वसाहतीत प्रदूषण जैसे थे

googlenewsNext

दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषणाबाबत पूर्वीपेक्षा चांगली स्थिती असल्याचे भासवले जात असले तरी वारंवार नाले रंगीत होणे, सकाळच्या सुमारास वायुप्रदूषण, नाल्यातील मासे मृत पावणे आदी घटना घडत आहेत. सातत्याने होत असलेल्या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाकडून केवळ नोटीस काढण्याची कारवाई करण्यात येत आहे. मात्र याबाबत बोलण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.

महाड औद्योगीक वसाहतीमध्ये बहुतांश कारखाने हे रासायनिक पदार्थ उत्पादन करणारे आहेत. यामुळे सातत्याने होत असलेल्या प्रदूषणाने महाड परिसर नापीक झाला आहे. येथील पिण्याचे पाण्याचे स्त्रोत आणि नद्या देखील प्रदूषित झाल्या आहेत. याचा परिणाम मानवी जीवनावर आणि निसर्गावर होत आहे. अनेक वेळा कारवाई करण्याच्या बतावण्या करणाऱ्या अधिकाºयांकडून समज नोटिसी आणि वेळ आल्यावर कारखाना बंदीच्या नोटिसी देण्यात आल्या आहेत. कंपनीमध्ये थातुरमातूर सुधारणा करून तसा अहवाल सादर करून या कंपन्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे महाड मधील सांडपाणी प्रदूषण हे कमी झाले असले तरी चोरमार्गाने आजही अनेक कारखाने सांडपाणी सोडून देण्याचे काम करत असल्याने महाड औद्योगिक वसाहतीमधील नाले रंगीत झाले आहेत.

गेला महिनाभर ई झोन, सी झोनमधील नाल्यात सातत्याने रंगीत पाणी येत आहे. याबाबत अनेक स्थानिक नागरिकांकडून प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांकडे तक्रारी करण्यात आली आहे. मात्र दूषित सांडपाणी नेमके येते कुठून याबाबत अद्याप तपासणी झालेली नाही. दोन दिवसापूर्वीच टेमघर नाल्यातील मासे मृत होण्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत देखील कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. कंपन्यातील दूषित सांडपाणी पावासाचा आधार घेवून रात्रीच्या वेळेस सोडून देण्याचे प्रकार परिसरात वारंवार घडत आहेत. यामध्ये लघु उद्योजकांसह मोठया कंपन्यांचा देखील समावेश आहे. महाडमधील काही कंपन्या राजकीय दबाव आणून या अधिकाºयांना कारवाईपासून दूर ठेवतात. प्रदूषण मंडळाचे अधिकारीही राजकीय दबावाला घाबरून या कंपन्यांवर कारवाईसाठी पुढे येत नाही. केवळ नोटीसी बजावत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. महाडमधील सानिका केमिकल या कारखान्याला अनेकदा कारवाईच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत मात्र ठोस कारवाई झालेली नाही. याचप्रमाणे अनेक कारखानदार हे मुंबई स्थित असल्याने त्याठिकाणाहून वरीष्ठ अधिकाºयांचा दबाव आणला जातो. यामुळे स्थानिक पातळीवरील अधिकारी केवळ नोटीसी देण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नाहीत हे उघड झाले आहे.
टेमघर नाल्याला आलेल्या पाण्याने मासे मृत पावले याबाबत दोन कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. येथील मीनाक्षी केमिकल या कारखान्याच्या कंपाऊंड शेजारीच रासायनिक पाण्याचा डोह तयार झाला आहे. मात्र याकडे देखील दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

औद्योगिक क्षेत्राला कोणी वालीच नाही...
च्महाड औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. कंपन्यांच्या कोणत्याच बाबातीत नियंत्रण राहीलेले नाही. कंपन्यांतील कामगार सुरक्षा, प्रदूषण आणि आरोग्य याबाबत कानाडोळा केला जात आहे. औद्योगिक क्षेत्राशी संबंधीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कामगार सुरक्षा विभाग, औद्योगिक फायर अ‍ॅन्ड सेफ्टी विभाग, सेंट्रल आणि राज्य एक्साईज विभाग, अशा विभागाकडून त्यांचे अधिकार वापरले जात नाहीत. यामुळे महाडमध्ये किती तरी कंपन्या कागदावर बंद असल्या तरी त्याठिकाणी छुपे व्यवसाय सुरू आहेत.
 

Web Title: Industrial estates were like pollution in Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.