नवी मुंबई : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले जात आहेत. उद्योग तिकडे जात आहेत व ड्रग्ज इकडे येत आहेत. राज्यातील बेरोजगारी वाढू लागली आहे. संविधान बदलू इच्छीणारांना आपण लोकसभेत रोखले. विधानसभेला पुन्हा रोखायचे आहे. महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणारांना धडा शिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र या असे आवाहन उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
नवी मुंबईमधील विष्णूदास भावे नाट्यगृहात पाटण तालुक्यातील मुंबई, नवी मुंबईमधील रहिवाशांचा मेळावा आयोजीत केला होता. या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टिका केली. त्यांना देशाचे संविधान बदलायचे होते. देशावर हुकूमशाही लादायची आहे. त्यांनी महाराष्ट्रात दोन पक्ष, एक घर फोडून हुकूमशाहीचे दर्शन घडविले. दोन वर्ष घटनाबाह्य सरकार सुरू आहे. महानगरपालिकांच्या निवडणूका घेतल्या जात नाहीत. लोकसभेला महाराष्ट्राने त्यांना रोखले. विधानसभेला पुन्हा रोखायचे आहे. राज्यातील उद्योग गुजरातला पळविले जात आहेत. औषध उद्योगही तिकडे नेला व ड्रग्ज मात्र तेथून येथे येत आहेत. राज्यातील तरूणांचा हाताला रोजगार नाही. ड्रग्जचा विळखा वाढत आहे. हे ड्रग्ज कोणत्या राज्यातून येताहेत हे पण पाहिले पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले. राज्याचे हित जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून लढा देवूया गद्दारांना धडा शिकवूया असे आवाहनही त्यांनी केले.उद्धवसेनेचे नेते नितीन बानुगडे पाटील यांनीही भाजपावर टिका केली. राज्यातील १६ प्रकल्प गुजरातला पळविले. आता ५६ टीमसी पाणी पळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात ४७ टक्के तरूण बेरोजगार असून नशेचा बाजार सुरू आहे. राज्यातील उद्योग पळविणारा विधानसभा निवडणुकीत धडा शिकविण्याचे आवाहनही त्यांनी केले. सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी पाटणमध्ये दबावाचे राजकारण करणाऱ्या गद्दारांना जनता धडा शिकवेल असे स्पष्ट केले. यावेळी बेलापूरचे जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, ऐरोलीचे द्वारकानाथ भोईर, एम. के. मढवी. सोमनाथ वास्कर, विजयानंद माने व इतर पदाधिकारी उपस्थित होते.