कुख्यात विकी देशमुख टोळीवर लावला मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 01:19 AM2020-02-22T01:19:01+5:302020-02-22T01:19:31+5:30
हत्येसह अनेक गंभीर गुन्हे : वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांची टाच
नवी मुंबई : हत्येसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुविख्यात गुंड विकी देशमुख याच्यासह त्याच्या टोळीवर पोलिसांनी मोक्का लावला आहे. या टोळीचे चौघे जण सध्या कोठडीत असून सूत्रधार विकी देशमुख याच्यासह त्याच्या इतर काही साथीदारांच्या शोधात पोलीस आहेत. त्यांनी सहा महिन्यांपूर्वी आपसातील वादातून एकाची हत्या करून तीनदा मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रासह लगतच्या शहरांमध्ये गुंड विकी देशमुख याच्या टोळीची दहशत वाढत चालली आहे. टोळीचा प्रमुख देशमुख हा अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याशिवाय त्याच्या साथीदारांवरही हत्या, दरोडे, चोरी, मारामारी यासह इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. देशमुख याच्या सांगण्यावरून त्याच्या सहकाऱ्यांनी सहा महिन्यांपूर्वी नेरूळ येथून सचिन गर्जे याचे अपहरण करून हत्या केली होती. तर हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी गर्जेचा मृतदेह खाडीत फेकला होता. परंतु मृतदेह किनाºयावर आल्याने तो वाळूत गाढला. यानंतरही त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी सदर मृतदेह कर्नाळा येथील घनदाट जंगलात नेऊन जाळला होता. या प्रकरणी देशमुखचे साथीदार विक्रांत कोळी, नारायण पवळे, रूपेश झिराळे व तुषार कोळी यांना अटक केली असून ते सध्या कोठडीत आहेत. परंतु टोळीचा सूत्रधार विकी देशमुख, जितेंद्र देशमुख, प्रीतम कोळी, रोशन कोळी, राकेश कोळी व परशुराम मोकल हे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. यामुळे पोलीस त्यांच्या शोधात आहेत. देशमुख टोळीची वाढती गुन्हेगारी दहशत लक्षात घेऊन पोलिसांनी त्याला आवर घालण्याची तयारी चालवली होती. त्यानुसार देशमुख याच्यासह त्याच्या संपूर्ण टोळीवर मोक्का (संघटित गुन्हेगारी) अंतर्गत कारवाई केल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त प्रवीणकुमार पाटील यानी सांगितले. त्याच्याकडून दहशत निर्माण करून गुन्हेगारी जगतात ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला जात होता. यामुळे देशमुख टोळीवर मोक्का लावल्याने त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.