महागाईमुळे चोरट्यांचे लक्ष कांद्यावर, एपीएमसीमध्ये चोरीचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 02:36 AM2019-11-28T02:36:08+5:302019-11-28T02:36:43+5:30

राज्यभर सुरू असलेल्या टंचाईमुळे चोरट्यांनीही कांद्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १५ ते २० महिला व मुले प्रतिदिन कांदा चोरून नेत आहेत.

Inflation has increased the focus of thieves on onions, theft in APMCs | महागाईमुळे चोरट्यांचे लक्ष कांद्यावर, एपीएमसीमध्ये चोरीचे प्रमाण वाढले

महागाईमुळे चोरट्यांचे लक्ष कांद्यावर, एपीएमसीमध्ये चोरीचे प्रमाण वाढले

googlenewsNext

नवी मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या टंचाईमुळे चोरट्यांनीही कांद्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १५ ते २० महिला व मुले प्रतिदिन कांदा चोरून नेत आहेत. चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची लेखी मागणी कांदा-बटाटा अडत व्यापारी संघटनेने बाजार समिती सचिवांकडे केली आहे.

मुंबईमध्ये प्रतिदिन १२०० ते १६०० टन कांद्याची मागणी आहे; परंतु सद्यस्थितीमध्ये सरासरी एक हजार टन आवक होत आहे. बुधवारी फक्त ८९६ टन आवक झाली आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्यामुळे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. सद्यस्थितीमध्ये होलसेल मार्केटमध्ये कांद्याचे दर ६० ते १०० रुपये झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर १३० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता चोरट्यांनीही कांद्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १५ ते २० महिला व काही लहान मुले कचºयात टाकलेला खराब माल उचलण्याच्या बहाण्याने मार्केटमध्ये प्रवेश करत आहेत. मालधक्याच्या बाजूला पडलेला माल उचलताना दोन्ही गाळ्यांच्या मध्ये ग्राहकांसाठी ठेवलेल्या नमुन्यांमधूनही कांदा उचलू लागल्या आहेत. याशिवाय लिलावगृहामध्ये ठेवलेल्या मालामधूनही मोठ्याप्रमाणात कांद्याची चोरी होऊ लागली आहे. प्रतिदिन १०० ते ५०० किलो माल बाहेर नेला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. व्यापाºयांचेही नुकसान होत आहे. चोरीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. व्यापाºयांनी संघटनेच्याही हा प्रकार निदर्शनास आणून दिला आहे. कांदा-बटाटा अडत व्यापारी संघाने याची दखल घेऊन बाजार समिती प्रशासनास पत्र दिले आहे.

बाजार आवारामध्ये टाकून दिलेला शेतमाल गोळा करण्यासाठी लहान मुले व महिला येत आहेत. गाळ्यासमोरील कचरा उचलण्याच्या बहाण्याने चांगला मालही चोरी करून घेऊन जात आहेत. या घटना वाढू लागल्या असून, संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. मार्केटमध्ये अशाप्रकारे कोणालाही प्रवेश दिला जाऊ नये. खरेदी पावती नसताना एक किलो मालही बाहेर घेऊन जाऊ दिला जाऊ नये. सुरक्षारक्षक संबंधितांना आतमध्ये प्रवेश देतातच का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. चोरीच्या या घटना तत्काळ थांबविण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशाराही व्यापाºयांनी दिला आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी मुख्य सुरक्षा अधिकारी अविनाश काकडे यांच्याशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.

सुरक्षा व्यवस्था कडक करावी
मार्केटच्या प्रवेशद्वारातून कचरा गोळा करण्याच्या बहाण्याने आतमध्ये येणाºयांना प्रवेश देऊ नये. संरक्षण कठड्यावरूनही कोणी आतमध्ये येणार नाही याची काळजी घेतली जावी. आवक गेटच्या बाजूला संरक्षण भिंत नसल्यामुळे तेथूनही काही महिला आतमध्ये येत असून या प्रकाराला आळा घालणे आवश्यक असल्याचे मत व्यापाºयांनी व्यक्त केले आहे.

कांदा-बटाटा आवारामध्ये कचरा वेचण्याच्या बहाण्याने कांदा चोरी केली जात असल्याचे ऐकण्यात आले आहे. याबाबत पाहणी करून संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. तसेच अशा प्रकारा आळा घालण्यासाठी सतर्क राहण्यासंदर्भात सुरक्षा कर्मचाºयांना तत्काळ आदेशित करण्यात येईल.
- कृष्णा रासकर,
सहायक मुख्य सुरक्षा अधिकारी, एपीएमसी

Web Title: Inflation has increased the focus of thieves on onions, theft in APMCs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.