कांदा-वाटाण्यासह पालेभाज्यांना महागाईचा तडका; मेथीसह कांदा ५०, तर वाटाणा २०० रुपये किलो
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 07:23 AM2023-10-20T07:23:45+5:302023-10-20T07:23:56+5:30
पुढील काही दिवस तेजी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कांदा, वाटाणासह पालेभाज्यांच्या किमती दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याचे दर प्रतिकिलो १६ ते ३६ रुपयांवर पोहचले असून किरकोळ मार्केटमध्ये ४५ ते ५० रुपये किलो दराने विक्री सुरू झाली आहे. मेथीच्या एक जुडीसाठीही ४० ते ५० रुपये मोजावे लागत आहेत.
मुंबई बाजार समितीमध्ये गुरुवारी १०२८ टन कांद्याची आवक झाली. मागील आठ दिवसामध्ये कांद्याचे दर वाढू लागले आहेत. गत आठवड्यात होलसेल मार्केटमध्ये कांदा ११ ते २७ रुपये किलो दराने विकला जात होता. गुरुवारी हे दर १६ ते ३६ रुपयांवर पोहोचले. किरकोळ मार्केटमध्येही तेजी असून चांगला कांदा ४५ ते ५० रुपये किलो दराने विकला जात आहे. पुढील काही दिवस तेजी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हिरव्या वाटाण्याच्या शेंगांची आवक कमी झाली आहे. बाजार समितीमध्ये २६ टन आवक झाली आहे. एका आठवड्यात बाजारभाव ७५ ते ९० वरून १०० ते १२० झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये वाटाणा १८० ते २०० रुपये दराने विकला जात आहे. किरकोळ मार्केटमध्ये मेथी ४० ते ५०, पालक ३० रुपये व पुदिना ३० ते ४० रुपये जुडी या दराने विकली जात आहे.