नवी मुंबई : थंडी सुरू होताच येथील मुंबई कृषी उन्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात राजस्थानमधील डाळिंबासह सोलापूर येथून येणाऱ्या गोल्डन सीताफळांची आवक वाढली आहे. थंडी सुरू असल्याने ग्राहकांडून त्यांना पसंती मिळत असल्याने भावही वधारले आहेत.
गोल्डन सीताफळाची रोज अंदाजे ४५० क्विंटलची आवक होत असून मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक आवक होत आहे. गोल्डन, सरस्वती या जातींच्या सीताफळे ठोक बाजारात ३० ते ४० रुपये किलो तर किरकोळ बाजारात शंभर रुपयांच्या आसपास प्रतिकिलोने विकली जात आहेत.
याशिवाय लालचुटुक डाळिंबांनीही फळ बाजार सजला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या राजस्थान येथून डाळिंबाची आवक वाढली असून ठोक बाजारात ६० ते १०० रुपये प्रतिकिलो ते मिळत आहेत. तसेच राज्यातील मराठवाडा, सोलापूर येथूनही डाळिंब येत असून ते राजस्थानी डाळिंबाच्या तुलनेने गोड असल्याने त्यांना मागणी जास्त आहे.