नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कर्नाळा किल्ला व अभयारण्याकडे पर्यटकांचा ओघ पुन्हा वाढू लागला आहे. गतवर्षी फक्त ४० हजार २११ जणांनी भेट दिली होती. या वर्षी १० महिन्यांत तब्बल ५७ हजार ९८८ पर्यटकांनी भेट दिली आहे. ऐतिहासिक वारसा स्थळासह पक्षीनिरीक्षणाची संधी मिळत असल्यामुळे मुंबई, ठाणेसह राज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे हजेरी लावत आहेत. पनवेलमधील प्रमुख पर्यटनस्थळांमध्ये कर्नाळा अभयारण्याचा समावेश होतो. परंतु, कोरोनानंतर या परिसरामधील पर्यटकांची संख्या कमी झाली होती. गतवर्षी पावसाळ्यात किल्ल्याच्या भाग खचल्यामुळे किल्ल्यावर जाण्यास बंदी घातली होती.
किल्ल्याचेही आकर्षणकर्नाळा किल्ल्याला इतिहासात विशेष महत्त्व आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते. किल्ल्यावरील सुळका, खडकात खाेदलेली तळी, पुरातन वास्तूंचे अवशेष, दरवाजा पाहण्यासारखा आहे.
या अभयारण्यात १३४ प्रकारचे स्थानिक व ३८ स्थलांतरीत पक्षी पाहावयास मिळतात. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा पक्षीनिरीक्षणासाठी योग्य वेळ आहे. वनविभागाने निरीक्षणासाठी सुविधा उपलब्ध केल्या असून, शिपाई बुलबुल, लालबुड्या बुलबुल, टकाचोर, राखी कपाळाची हारोळी, नारंगी डोक्याचा कस्तूर, निळा माशीमार, बाकचोच सातभाई, रानपारवा, पाचू होला, माशीमार, कोकीळ, रान धोबी, पांढऱ्या गालाचा कटुरगा, कोतवाल, फुलटोच्या, टोई पोपट, राखी कोतवाल, वेडा राघू, चष्मेवाला, करडा धोबी, भांगपाडी मैना, दयाळ, टिटवी, हुदहुद, ठिपकेवाला पिंगळा, शिंपी, तुरेवाला सर्पगरूड, जांभळा शिंजीर, तिबोटी धिवर, नील कस्तूर, नील दयाळ व इतर पक्षी पाहावयास मिळणार आहेत.
याचा परिणाम पर्यटकांच्या उपस्थितीवरही झाला होता. २०२०मध्ये ९९,८३५ भारतीय व १०२ विदेशी नागरिकांनी भेट दिली होती. २०२१ मध्ये ६५,२८८ भारतीय व २९ विदेशी नागरिकांनी हजेरी लावली होती. २०२२ मध्ये सर्वांत कमी ४०,२११ भारतीय व ६५ विदेशी नागरिकांनी भेट दिली. वन विभागाने यावर्षी किल्ला पुन्हा सुरू केला आहे. चालू वर्षात ऑक्टोबर महिन्यापर्यंत ५७ हजार ९८८ पर्यटकांनी भेट दिली असून, डिसेंबरअखेर यात अजून भर पडणार आहे.
कर्नाळा परिसरामध्ये पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. किल्ला व अभयारण्याला विविध ठिकाणावरून पर्यटक भेट देत आहेत. - एन. डी. राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्नाळा