नवी मुंबईत होणाऱ्या वाहतूक कोंडीची माहिती मोबाइल अॅपद्वारे
By admin | Published: August 25, 2015 01:46 AM2015-08-25T01:46:15+5:302015-08-25T01:46:15+5:30
वाहतुकीसंदर्भात सर्व माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाच्या वतीने ‘नवी मुंबई ट्रॅफिक अॅप’ हे अॅण्ड्रॉइड अॅप मार्च
नवी मुंबई : वाहतुकीसंदर्भात सर्व माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाच्या वतीने ‘नवी मुंबई ट्रॅफिक अॅप’ हे अॅण्ड्रॉइड अॅप मार्च महिन्यात विकसित केले होते. या अॅपच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम, रस्ता सुरक्षा नियमावली, रुग्णालये, अग्निशमन केंद्र, वाहतुकीचे नियम व चिन्हे आदी सर्व माहिती देण्यात आली होती. याच अॅपमध्ये आता सुधारणा करून लवकरच वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची माहितीही या अॅपद्वारे दिली जाणार आहे.
मार्च महिन्यात विकसित झालेल्या या अॅपला आत्तापर्यंत नवी मुंबईकरांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. या अॅपद्वारे पुरविले जाणारे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या पोलीस स्थानकांचे संपर्क, रुग्णालयांची माहिती, रुग्णवाहिका, टोविंग वाहने यांची माहिती दिलेली आहे. याच अॅपमध्ये बदल करून काहीच दिवसांमध्ये शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची माहिती दिली जाणार आहे. गणेशोत्सवादरम्यान अनेकवेळा वाहतूक मार्गात अडथळे येतात.
त्यामुळे प्रवाशांचे कोणत्याही प्रकारचे हाल होऊ नये याकरिता गणेशोत्सवापूर्वी हे सुधारित अॅप वापरात आणणार असल्याची माहिती नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली. या नवीन बदलामुळे शहरातील रस्त्यांवरील दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहितीही पुरविली जाणार असून कोणत्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे, याची देखील माहिती यावर उपलब्ध होणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस उपआयुक्त अरविंद साळवे यांनी दिली.
या अॅपच्या युझर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांकडून चांगले अभिप्राय मिळत असल्याची माहिती साळवे यांनी दिली. या अॅपमध्ये दिली जाणारी माहिती ही चित्रस्वरूपात असल्याने वापरकर्त्यांना ती सहज समजण्याजोगी आहे. महत्त्वाच्या वेळांमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या तत्काळ सूचना या माध्यमातून पुरविल्या जाणार आहेत. कॅलिबर टेक्नॉलॉजी, सीवूड्स नेरुळ यांनी हे अॅप विकसित करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.