माहिती तंत्रज्ञान कंपनीची ५८ लाखांची फसवणूक, कोलकातामध्ये गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:48 AM2019-09-19T00:48:58+5:302019-09-19T00:49:02+5:30
प्रोस्टाम इन्फो. लि.मी. कंपनीची बँकेतील भांडवलाची मर्यादा वाढवून देण्याचे आमिष दाखवून ५८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.
नवी मुंबई : प्रोस्टाम इन्फो. लि.मी. कंपनीची बँकेतील भांडवलाची मर्यादा वाढवून देण्याचे आमिष दाखवून ५८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी कोलकातामध्ये गुन्हा दाखल झाला असून प्रकरण पुढील तपासासाठी सानपाडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
याप्रकरणी प्रोस्टाम कंपनीमध्ये काम करणाऱ्या शिल्पा दुगर यांनी कोलकातामधील फुलबगान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यांच्या कंपनीचे मुख्यालय सानपाडा येथील मेरीडीयन बिजनेस सेंटरच्या अकराव्या मजल्यावर आहे. त्यांची कंपनी संगणकासाठी लागणारे यूपीएस पोर्ट खरेदी-विक्रीचा व्यापार करत आहेत. त्यांच्या व्यापारासाठी लागणाºया भांडवलासाठी बँकेची मर्यादा वाढवून देण्याचे आमिष चंदीगडमधील एका कंपनीने दाखविले होते. यासाठी जानेवारी ते आॅगस्ट २०१९ दरम्यान कंपनीकडून तब्बल ५८ लाख ५० हजार रुपये घेतले होते; परंतु प्रत्यक्षात त्यांचे काम करून दिले नाही. पैसेही दिले नाहीत व ठरलेले कामही करून दिले नाही.
याप्रकरणी २७ आॅगस्टला कोलकातामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणूक झालेल्या कंपनीचे मुख्यालय सानपाडामध्ये असल्यामुळे व गुन्हाही याच ठिकाणी घडलेला असल्यामुळे हे प्रकरण पुढील तपासासाठी नवी मुंबई पोलिसांकडे पाठविण्यात आले आहे. याविषयी १७ सप्टेंबरला सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. भातुसे करत आहेत.