बंदूक बनवण्याची युट्युबवरून माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 01:27 AM2020-02-22T01:27:03+5:302020-02-22T01:27:20+5:30
दोघांच्या अटकेनंतर प्रकार उघड
नवी मुंबई : अवैधरीत्या शस्त्र विक्रीसाठी आलेल्या दोघांच्या अटकेनंतर त्यांनी पनवेल व कर्जत परिसरात अनेकांना बंदुक विकल्या असल्याचे समोर आले आहे. या दोघांनी बंदूक दुरुस्तीच्या दुकानात काम करत असतानाच युट्युबवर बंदुकीची माहिती मिळवून १२ बोअरच्या बंदुका बनवण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडून १० बंदुका व आठ अर्धवट बनवलेल्या बंदुका तसेच त्या बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने पनवेल परिसरात सापळा रचून परशुराम पिरकड व दत्तात्रय पंडित यांना अटक केली होती. हे दोघेही त्या ठिकाणी अवैधरीत्या शस्त्र विक्रीसाठी त्या ठिकाणी आले होते. या वेळी त्यांच्याकडून देशी बनावटीच्या बारा बोअरच्या दहा बंदुका व २ काडतुसे आढळून आली होती. तर त्यांच्या अधिक चौकशीत ते स्वत बंदूक बनवून विक्री करत असल्याचे समोर आले. स्वत:च्या वास्तव्याच्या ठिकाणीच त्यांनी बंदूक बनवण्याचा कारखाना सुरू केला होता. त्यासाठी लागणारे साहित्य कुर्ला, कर्जत, खोपोली तसेच पनवेल परिसरातून खरेदी करत होते. यानुसार पोलिसांनी त्यांच्याकडून बंदूक बनवण्याचे साहित्य व अर्धवट बनवलेल्या ८ बंदुका जप्त केल्या आहेत. त्यांच्याविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी दिली. याप्रसंगी सहायक आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ निरीक्षक एन.बी. कोल्हटकर आदी उपस्थित होते.
अटक केलेले दोघेही काही वर्षांपूर्वी एका बंदूक दुरुस्तीच्या दुकानात कामाला होते. त्या ठिकाणी काम करत असतानाच त्यांना बंदुकीची थोडीफार माहिती झाली होती. यानंतर तीन वर्षांपासून ते युट्युबवर माहिती मिळवून बारा बोअरच्या बंदुका बनवू लागले होते. या कालावधीत त्यांनी पनवेल व कर्जत परिसरातील अनेकांना बारा बोअरच्या बंदुका विकल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार बंदूक खरेदी करणाऱ्या व्यक्तींचाही पोलीस शोध घेत आहेत.