हुंड्यासाठी मुंबईतील विवाहितेचा अमानुष छळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 12:27 AM2018-12-03T00:27:46+5:302018-12-03T00:27:52+5:30
लग्नात हुंडा न आणल्याच्या कारणावरून विवाहितेला दोनदा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नवी मुंबई : लग्नात हुंडा न आणल्याच्या कारणावरून विवाहितेला दोनदा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईच्या कुलाबा परिसरात हा प्रकार घडला असून सासरच्या त्रासाला कंटाळून कोपरखैरणेत आल्यानंतर विवाहितेने घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यादरम्यान पहिल्या पत्नीची माहिती लपवून पतीने तिच्यासोबत दुसरे लग्न केल्याचीही बाब उघड झाली.
कुलाबा येथील रॉबर्ट हाउस कॉम्प्लेक्स या उच्चभ्रू वसाहतीमध्ये हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी मागील चार वर्षांत पती व सासूने अमानुष अत्याचार केल्याची तक्रार पीडित विवाहितेने कोपरखैरणे पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार पती शरद मणारी व सासू सुभाषिनी मणारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद याचे पहिले लग्न झालेले असून तिच्यापासून घटस्फोट घेतलेला नाही. त्यानंतरही पहिल्या लग्नाची माहिती लपवून त्याने पीडित महिलेसोबत दुसरे लग्न केले होते. मात्र लग्नानंतर काही दिवसातच त्यांनी पत्नीचा मानसिक तसेच शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. माहेरून स्त्रीधन आणले नाहीस त्यामुळे गरोदर राहायचे नाही अशी सक्ती तिच्यावर लादली गेली होती. त्यानंतरही पतीकडून ती दोनदा गरोदर राहिली असता, आवश्यक उपचारांकडे व देखभालीकडे दुर्लक्ष करून दोन्ही वेळेस गर्भपात होण्यास तिला भाग पाडले गेले. यामुळे पीडितेच्या वडिलांनी सासरच्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली. अखेर पती व सासूकडून होणारा अमानुष छळ व गलिच्छ भाषेतील शिव्या याला कंटाळून पीडितेने त्यांच्यापासून स्वत:ची सुटका करून घेतली. दरम्यान त्या कोपरखैरणेत रहायला आल्या असता, त्यांनी घडलेल्या संपूर्ण प्रकाराची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानुसार पती व सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच लग्नात हुंड्याच्या स्वरूपात घेतलेल्या वस्तू व दागिन्यांचा परस्पर अपहार केल्याचीही तक्रार दाखल करण्यात आली आहे.