अरुणकुमार मेहत्रे / कळंबोलगणेश विसर्जनाकरिता प्रमुख असलेल्या कळंबोलीतील रोडपाली तलावाची अवस्था अतिशय बिकट झाली होती. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जलशयाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. याकरिता २ कोटी ६७ लाख रुपये खर्च येणार असून प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली आहे. पावसाळ्यापर्यंत हे पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पनवेल-सायन महामार्गाला जोडणाऱ्या रोडपाली रस्त्यावर हा जुना तलाव आहे. सिडकोने जमीन संपादित करण्याच्या आधीपासून हा तलाव होता. गणपती विसर्जनाकरिता या जलाशयाचा वापर करण्यात येत असे. सिडकोने कळंबोली वसाहत विकसित केल्यानंतर हा तलाव तसा दुर्लक्षितच राहिला होता. त्यानंतर रोडपालीतील अनेक सेक्टर विकसित झाले तरीसुद्धा तलावाची डागडुजी झाली नाही. या ठिकाणी कळंबोली परिसरातील गणपतीचे विसर्जन करण्यात येत आहे. त्यामुळे तलावाचे सुशोभीकरण व्हावे, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार सिडकोचे तत्कालीन अधीक्षक अभियंता किरण फणसे यांनी प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला. या कामाची निविदा प्रसिद्ध करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. रोडपाली परिसरात विरंगुळ्याकरिता कोणतीच व्यवस्था नाही. क्षणभर विश्रांती घेण्याकरिता या तलावाचे सुशोभीकरण वरदान ठरेल, अशी प्रतिक्रि या चंद्रकांत राऊत यांनी व्यक्ती केली. तलावाच्या बाजूला चालण्याकरिता पदपथ तयार करण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रेलिंग लावण्याचा प्रस्ताव आहे. मोकळ्या जागेत लँडस्केपिंग करण्यात येणार असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले. छोटी लॉनसुद्धा विकसित करण्याचे आराखड्यात नियोजन आहे. विसर्जन घाट अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. कुटीर आसन व्यवस्था सिडको येथे करणार आहे. सेंट्रल पार्कचे डिझाईन केलेले मडाव कन्सल्टन यांनी या तलावाच्या सुशोभीकरणाचा आराखडा तयार केला आहे.
रोडपालीत तलावाच्या सुशोभीकरणास सुरूवात
By admin | Published: April 10, 2017 6:18 AM