दिवाळीत नागरिकांसाठी मोफत फिरता दवाखाना, मंदा म्हात्रे यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 12:29 AM2020-11-04T00:29:46+5:302020-11-04T00:30:04+5:30
mobile hospital : मंदा म्हात्रे यांच्या पुढाकाराने तथा महानगरपालिका व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त सहकार्यातून हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
नवी मुंबई : सणासुदीच्या उत्साहात कोरोना पुन्हा तोंड वर काढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नवी मुंबईकरांना तातडीचे उपचार मिळावेत, या दृष्टीने बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नातून बेलापूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात मोफत फिरता दवाखाना सुरू होणार आहे.
मंदा म्हात्रे यांच्या पुढाकाराने तथा महानगरपालिका व एचडीएफसी बँक यांच्या संयुक्त सहकार्यातून हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. दिवाळीच्या उत्सवातील उत्साहातून कोरोना पुन्हा डोके वर काढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेता यावी, या उद्देशाने मंदा म्हात्रे यांनी मतदार संघातील प्रत्येक प्रभागात मोफत फिरता दवाखाना सुरू करण्याची योजना आखली आहे. प्रथमोपचार, मोफत तपासणी, मोफत बी.पी. व मधुमेह तपासणी करण्यात येणार असून, गरजेनुसार मोफत औषधे दिली जाणार आहेत.
बेलापूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांना याचा लाभ घेता यावा, याकरिता सर्व ५१ प्रभागांत हा मोफत फिरता दवाखाना संपूर्ण १ महिन्याकरिता उपलब्ध करण्यात येणार आहे. मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२० पासून या उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे. सकाळी ८ ते दुपारी १ व दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत असे दिवसातून २ टप्प्यांत हा फिरता दवाखाना नागरिकांसाठी सुरू राहील, अशी माहिती मंदा म्हात्रे यांनी दिली आहे.