जखमी पक्ष्यांना, प्राण्यांना आता उपचाराचा 'आधार' राज्यात वन्य प्राणी अपंगालयाची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 11:01 AM2024-06-15T11:01:14+5:302024-06-15T11:01:49+5:30

Wild Life: नवी मुंबई येथील पनवेलजवळच्या कर्नाळा अभयारण्यासह राज्यातील ६ राष्ट्रीय उद्याने, ५२ अभयारण्ये, २८ संवर्धन राखीव क्षेत्र अशी ७६ वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आणि सहा व्याघ्र राखीव क्षेत्रात अनेकदा विविध कारणास्तव अनेक प्राणी, पक्षी जखमी होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.

Injured birds, animals are now treated 'Aadhar' by setting up a wild animal dispensary in the state | जखमी पक्ष्यांना, प्राण्यांना आता उपचाराचा 'आधार' राज्यात वन्य प्राणी अपंगालयाची स्थापना

जखमी पक्ष्यांना, प्राण्यांना आता उपचाराचा 'आधार' राज्यात वन्य प्राणी अपंगालयाची स्थापना

- नारायण जाधव
नवी मुंबई - येथील पनवेलजवळच्या कर्नाळा अभयारण्यासह राज्यातील ६ राष्ट्रीय उद्याने, ५२ अभयारण्ये, २८ संवर्धन राखीव क्षेत्र अशी ७६ वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आणि सहा व्याघ्र राखीव क्षेत्रात अनेकदा विविध कारणास्तव अनेक प्राणी, पक्षी जखमी होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. अशा जखमी पशु पक्ष्यांसह प्राण्यांवर उपचार करून त्यांच्या संवर्धनासाठी राज्यात आता वन्यप्राणी अपंगालयाची स्थापना करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात एकूण ६१९०६.०५ चौरस किलोमीटर वनक्षेत्र असून, त्याचे भौगोलिक क्षेत्राशी प्रमाण २०.१२ टक्के आहे. या वनांमधील वन्यजीव व त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२च्या तरतुदीनुसार राज्यामध्ये उपरोक्त ६ राष्ट्रीय उद्याने, ५२ अभयारण्ये, २८ संवर्धन राखीव क्षेत्र अशी एकूण ७६ वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आणि सहा व्याघ्र राखीव क्षेत्र अधिसूचित केली आहेत.

यासाठी आहे वन्य प्राणी अपंगालयाची गरज
राज्यातील व्याघ्र प्रकल्पांसह राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांत विविध जाती-प्रजातीच्या वन्य प्राण्यांचा अधिवास आहे. यात अनेक दुर्मिळ प्राण्यांचाही समावेश आहे. मात्र, अनेकदा या क्षेत्रांत विविध प्राण्यांच्या हल्ल्यात वा अन्य कारणास्तव अनेक प्राणी गंभीर जखमी होतात. मात्र, उपचार करून त्यांचे संवर्धन करून त्यांना पुन्हा जंगलात सोडण्याच्या सोयीसुविधा फारच तोकड्या आहेत. हे लक्षात घेऊन राज्याच्या वन विभागाने वन्य प्राणी अपंगालयाची स्थापना केली आहे. आता पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय प्राणी संग्रहालयाची मान्यता घेतल्यानंतर या वन्य प्राणी अपंगालयाचा मार्ग सुकर होणार आहे.

दुर्मीळ वन्य प्राण्यांचे संवर्धन करणार
यात कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या प्राण्यांची देखभाल करणे, मानवी जीवितास धोकादायक असलेल्या प्राण्यांना वेळप्रसंगी कायमचे जेरबंद करण्याकरिता वन्य प्राणी बचाव केंद्राची अर्थात ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरची निर्मितीही या अंतर्गत करण्यात येणार आहे. याकरिता विविध क्षेत्रीय स्तरावर उपयुक्त अशी आधुनिक उपकरणांनी सुसज्ज वाहने उपलब्ध करण्यात येणार आहेत. राज्यामध्ये नामशेष होणाऱ्या दुर्मीळ वन्यजीव प्रजातींच्या संवर्धनासाठी सुविधा निर्माण करून वन्यजीव संरक्षणाचा उद्देशसुद्धा वन्य प्राणी अपंगालयाच्या स्थापनेमागे आहे.

Web Title: Injured birds, animals are now treated 'Aadhar' by setting up a wild animal dispensary in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.