नवी मुंबईतील गतिमंद मुलींचा अटकेपार झेंडा
By admin | Published: August 6, 2015 12:35 AM2015-08-06T00:35:41+5:302015-08-06T00:35:41+5:30
एस स्पेशल आॅलिम्पिकमध्ये वर्ल्ड समर गेम्समध्ये खारघर येथे राहणाऱ्या गतिमंद २१ वर्षीय स्नेहा वर्मा हिने सुवर्णपदक मिळवून भारताचे नाव उंचावले
नवी मुंबई : यूएस स्पेशल आॅलिम्पिकमध्ये वर्ल्ड समर गेम्समध्ये खारघर येथे राहणाऱ्या गतिमंद २१ वर्षीय स्नेहा वर्मा हिने सुवर्णपदक मिळवून भारताचे नाव उंचावले. २७ जुलै रोजी झालेल्या लॉस एन्जेलिस, अमेरिका येथे झालेल्या या आॅलिम्पिक्समध्ये ४० मी. फ्री स्टाईल स्विमिंगमध्ये स्नेहा वर्मासारख्या विशेष मुलीने मिळविलेल्या यशाने शहरात कौतुकाचा वर्षाव झाला. या स्पर्धेत स्नेहाने भारताचे प्रतिनिधित्व करून भारताचा तिरंगा परदेशी फडकविला.
स्नेहा वर्मा ही सीबीडीमधील स्वामी ब्रम्हानंद प्रतिष्ठान या विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थिनी असून वयाच्या दहाव्या वर्षापासून ती पोहण्याचे प्रशिक्षण घेत असून आतापर्यंत तिने जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरावर पोहण्याच्या अनेक स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे. २०१३ साली कर्नाटकात झालेल्या राष्ट्रीय आॅलिम्पिक स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविले होते. पोहण्याच्या सरावाबरोबरच ती नृत्याचेही प्रशिक्षण घेत असून शहरातील अनेक नृत्यस्पर्धेतही तिने भरपूर बक्षिसे मिळविली आहेत.
पनवेलच्या दिशा मारू या विद्यार्थिनीनेही २५ मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत चांदीचे पदक मिळविले. दिशा सीबीडीतील स्वामी ब्रम्हानंद प्रतिष्ठान या विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थिनी असून वयाच्या पाचव्या वर्षापासून पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहे. यावेळी मुख्याध्यापिका सुकन्या वैंकटरमण यांनी दोघींचे कौतुक करून अपंगत्व असूनही सर्वसामान्य मुलांपेक्षा मुलींची कामगिरी आणि त्यांना मिळालेले यश नक्कीच वाखणण्याजोगे असल्याचे सांगितले.