नवी मुंबई : अहमदनगरमधील पाथर्डीमधून नवी मुंबईत आलेल्या रसविक्रेत्यांवर पालिकेने कारवाई सुरू केली आहे. कारवाईमुळे दुष्काळग्रस्त शेतकरी त्रस्त झाले आहेत. दुष्काळग्रस्तांवर सुरू असलेली अन्यायकारक कारवाई थांबविण्याची मागणी युवा सेनेने केली आहे. निसर्ग कोपल्याने वारंवार दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. परंतु अहमदनगरमधील पाथर्डीमधील शेतकऱ्यांनी संकटाशी सामना देत पावसाळा व हिवाळ्यात शेतामध्ये काम करायचे व उन्हाळ्यामध्ये नवी मुंबईसारख्या शहरामध्ये जावून उसाचा रस विक्री करण्याचा व्यवसाय करण्यास सुरवात केली आहे. अनेक वर्षांपासून फेब्रुवारी ते मेपर्यंत अनेक दुष्काळग्रस्त शेतकरी दाम्पत्य नवी मुंबईमध्ये रसविक्रीचे काम करत असल्याचे पाहावयास मिळते. पालिका प्रशासनही माणुसकीच्या नात्याने त्यांना सहकार्य करते. परंतु यावर्षी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशावरून रसविक्रेत्यांवर कारवाई सुरू झाली. रसाचा गाडाच जप्त केला जात असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. अनेकांनी जप्त केलेले साहित्य परत मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांकडे विनंत्या केल्या असून काही शेतकऱ्यांनी व्यवसाय बंद करून गावाकडे जाण्याची तयारी सुरू केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी युवा सेनेने केली आहे. (प्रतिनिधी)
पाथर्डीतील दुष्काळग्रस्त रसविक्रेत्यांवर अन्याय
By admin | Published: April 18, 2017 6:51 AM