कामगार खात्याकडूनच कष्टकरी माथाडींवर अन्याय
By नामदेव मोरे | Published: February 12, 2024 08:51 PM2024-02-12T20:51:28+5:302024-02-12T20:52:01+5:30
नरेंद्र पाटील यांच्याकडून सरकारला घरचा आहेर : कामगार मंत्र्यांसह अधिकाऱ्यांवरही टिका
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे कामगार खातेच कष्टकरी माथाडी कामगारांवर अन्याय करत आहे. मंत्री व अधिकारी कामगारांचे प्रश्न सोडवत नाहीत अशा शब्दात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला. कामगारांचे प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी दिला.
पिंपची चिंचवड येथील टाटा मोटर्स कंपनीमधील व राज्यातील माथाडी कामगारांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी १२ फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर उपोषण सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनीयनचे सरचिटणीस व अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आंदोलन करणाऱ्या कामगारांची भेट घेतली. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कामगार मंत्री, कामगार सचिव, आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. परंतु त्यांच्याकडून प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कामगार खात्याचे मंत्री व अधिकारीच कामगारांवर अन्याय करत आहेत. शासनाने तत्काळ कामगारांचे प्रश्न सोडविले नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.
आझाद मैदानावर उपोषण करणाऱ्या कामगारांनी टाटा मोटर्समध्ये काम करणाऱ्या टोळी क्रमांक ४९५ मधील कामगारांचे प्रश्न सोडविण्यात यावेत.कामगारांची मजूरी थेट मंडळामध्ये जमा करण्यात यावी. कोल्हापूर ग्रोसरी बोर्ड, भाजीपाला, रेल्वे बोर्डातील कामगारांचे प्रश्न सोडविण्यात यावेत अशी मागणी यावेळी केली. आंदोलनस्थळी संघटनेचे संयुक्त सरचिटणीस रविकांत पाटील, दिलीप खोंड, पोपटराव देशमुख, कृष्णांत पाटील व इतर पदाधिकारीही उपस्थित होते. दिवसभरात कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेटही न घेतल्यामुळे दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू च ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.