हुतात्म्यांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या आदिवासींवर अन्याय
By admin | Published: January 5, 2017 06:07 AM2017-01-05T06:07:20+5:302017-01-05T06:07:20+5:30
इंग्रजांनी हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील यांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले नव्हते. तीन दिवस उघड्यावर असलेल्या मृतदेहांवर सिद्धगडावरील आदिवासी घिगे
नामदेव मोरे, नवी मुंबई
इंग्रजांनी हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी पाटील यांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले नव्हते. तीन दिवस उघड्यावर असलेल्या मृतदेहांवर सिद्धगडावरील आदिवासी घिगे कुटुंबीयांनी विधिवत अंत्यसंस्कार केले. ७३ वर्षांपासून समाधीची देखभाल करणाऱ्या या आदिवासींचा साधा सन्मानही शासनाने केला नाहीच; परंतु पिढ्यानपिढ्या कसणारी शेतजमीन व घरांवरील हक्क नाकारून त्यांना बेघर करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
आझाद दस्ता ही स्वातंत्र्यचळवळीतील महत्त्वाची क्रांतिकारी संघटना. रेल्वे रूळ उखडून व विजेचे टॉवर कापून इंग्रजांना जेरीस आणणाऱ्या या संघटनेचे प्रमुख भाई कोतवाल मुरबाड तालुक्यातील सिद्धगडावर इंग्रजांशी लढताना शहीद झाले. त्यांचे सहकारी हिराजी पाटील हेही गोळीबारात ठार झाले. इंग्रजांनी कोतवाल यांचा मृतदेह जवळपास ५०० मीटर फरफटत खाली आणला. वडील व नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह देण्यास नकार दिला होता. या मृतदेहावर कोणीही अंत्यसंस्कार करायचे नाहीत, असा आदेश इंग्रजांनी दिला होता; परंतु सिद्धगडावरील देशप्रेमी भागो रावजी घिगे व त्यांचे भाऊ राघो घिगे, बाळा घिगे व कुसा घिगे यांनी त्यांच्या शेतामध्ये या क्रांतिकारकावर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार झालेले ठिकाण स्मारक म्हणून जतन केले. २ जानेवारी, १९४३पासून आतापर्यंत ७३ वर्षे घिगे कुटुंबीय स्मारकाची देखभाल करत आहेत. त्यांनी अंत्यसंस्कार केले नसते व घटना कुठे घडली याची माहिती दिली नसती, तर या महान क्रांतिकारकाच्या पराक्रमाच्या रक्ताने पावन झालेली ही वीरभूमी जगाला कळलीच नसती. या कामगिरीसाठी घिगे कुटुंबीयांनाही स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा देणे आवश्यक होते. त्यांच्या वारसांना नोकरी व इतर सुविधा देणे आवश्यक होते; मात्र १९७७मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण व मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते फक्त एक नारळ दिला.
भाई कोतवाल यांच्यावर अंत्यसंस्कार करणाऱ्या भागोजी घिगे यांचे चिरंजीव सावळाराम घिगे (वय ७५) व त्यांचे कुटुंबीय समाधीची वर्षभर देखभाल करतात. येथे येणाऱ्या इतिहासप्रेमींना २ जानेवारी, १९४३च्या पहाटे इंग्रजांनी केलेला हल्ला व नंतर हुतात्म्यांच्या पार्थिवाची केलेली अवहेलना ते विद्यमान स्थितीपर्यंतचा सर्व इतिहास सांगण्याचे काम करत आहेत. या कुटुंबीयांचा शासनाकडून उचित सन्मान करण्याऐवजी त्यांना या परिसरातून हाकलून देण्याच्या हालचाली सुरू आहेत. हा परिसर अभयारण्य घोषित झाल्यापासून वनविभाग वारंवार त्यांना नोटीस देत आहे.