चौकशी समिती देणार दोन आठवड्यांत अहवाल; वादग्रस्त चाचण्यांची पडताळणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 01:55 AM2020-12-04T01:55:48+5:302020-12-04T01:56:01+5:30
चाचणी घोटाळा प्रकरण : दोन आठवड्यांत हा अहवाल सादर केला जाणार आहे. या अहवालानंतरच कोरोना चाचणीमध्ये घोटाळा झाला की तांत्रिक चुका होत्या? हे स्पष्ट होणार आहे.
नवी मुंबई : कोरोना चाचण्यांमध्ये घोटाळा झाला की नाही? हे तपासण्यासाठी महानगरपालिकेने चौकशी समिती नियुक्त केली आहे. दोन आठवड्यांत ही समिती अहवाल देणार? आहे. समितीने वादग्रस्त चाचण्यांची पडताळणी सुरू केली असून, समिती काय अहवाल देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अँटिजेन चाचण्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. काही वर्षांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तींचा अहवालही निगेटिव्ह आल्याचे निदर्शनास आणून दिले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही मनपा आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. यानंतर आयुक्तांनी अहवाल नोंदणीचे काम करणारे डॉ. सचिन नेमाणे यांना निलंबित करून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमली आहे. या समितीने कोरोना चाचण्यांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. याविषयी आवश्यक माहिती संबंधित विभागाकडून घेऊन त्यांची पडताळणी सुरू केली आहे.
दोन आठवड्यांत हा अहवाल सादर केला जाणार आहे. या अहवालानंतरच कोरोना चाचणीमध्ये घोटाळा झाला की तांत्रिक चुका होत्या? हे स्पष्ट होणार आहे. महानगरपालिका प्रशासन १३ मार्चपासून कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबवत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यातही यश मिळविले आहे. परंतु घोटाळ्याच्या आरोपामुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झाली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी होत आहे.
आयुक्तांच्या बदलीचीही चर्चा
घोटाळ्याच्या आरोपामुळे नवी मुंबई महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे. यामुळे शहरात याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची बदली केली जाणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. याविषयी काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता या अफवा असल्याचे सांगण्यात आले असून चौकशीचा अहवाल आल्यानंतर सर्व स्पष्ट होईल, असेही स्पष्ट केले आहे.