पोलिसांच्या ताफ्यात दहा पीसीआर व्हॅन दाखल
By Admin | Published: May 2, 2017 03:28 AM2017-05-02T03:28:38+5:302017-05-02T03:28:38+5:30
संकटसमयी नागरिकांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दहा नव्या पीसीआर व्हॅन कार्यरत
नवी मुंबई : संकटसमयी नागरिकांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दहा नव्या पीसीआर व्हॅन कार्यरत करण्यात आल्या आहेत. या व्हॅनचे लोकार्पण सोमवारी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने करण्यात आले. या व्हॅन शहराअंतर्गत व महामार्गावर गस्तीसाठी वापरल्या जाणार आहेत.
नागरिकांना संकटसमयी पोलिसांकडून मिळणाऱ्या मदतीचा प्रतिसाद कालावधी कमी करण्याचा प्रयत्न नवी मुंबई पोलिसांकडून होत आहे. त्यानुसार अधिकाधिक कमी वेळेत नागरिकांपर्यंत कसे पोहोचता येईल याकरिता फिरती पथके तयार करण्यात आलेली आहेत; परंतु सद्यस्थितीला फिरत्या पथकांकडे चांगल्या वाहनांची कमतरता असल्यामुळे संकटात असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. या अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दहा नवीन पीसीआर व्हॅन दाखल करण्यात आल्या आहेत. त्यांचे वाटप सोमवारी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कळंबोली मुख्यालयाच्या ठिकाणी करण्यात आले.
महिलांच्या सुरक्षेसाठी परिमंडळ १ व २मध्ये प्रत्येकी एक व्हॅन देण्यात आली आहे. एखादी महिला संकटात असल्याची माहिती कंट्रोल रूमवर मिळाल्यास ती माहिती या पथकाला देऊन महिलेच्या मदतीसाठी तत्काळ पाठवले जाणार आहे. तर हायवे पेट्रोलिंगसाठी एक व्हॅन कार्यरत करण्यात आली आहे. ही व्हॅन आयुक्तालय हद्दीत वाशी खाडीपुल ते गोवा महामार्गादरम्यान सशस्त्र गस्त घालणार आहे.
यामुळे अपघातग्रस्तांना तत्काळ पोलिसांची मदत मिळणार असून गुन्हा करून शहराबाहेर पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुन्हेगारांनाही अटकाव घालणे शक्य होणार आहे. त्याशिवाय परिमंडळ-१मध्ये पोलीस ठाणे हद्दीत गस्तीसाठी तीन व परिमंडळ-२ मध्ये पोलीस ठाणे हद्दीत चार अल्फा मोबाइल व्हॅन देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एक पोलीस निरीक्षक अथवा उपनिरीक्षक व चार कर्मचारी असणार आहेत. (प्रतिनिधी)
शहरात गस्तीसाठी दहा पीसीआर मोबाइल व्हॅन कार्यरत करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे पोलीस ठाणे अंतर्गत व आयुक्तालय कार्यक्षेत्रातल्या महामार्गावर गस्त घातली जाणार आहे. तर महिलांच्या मदतीसाठी दोन्ही परिमंडळामध्ये प्रत्येकी एक विशेष महिला पथक असलेली महिला सुरक्षा पेट्रोलिंग व्हॅन कार्यरत करण्यात आली आहे.
- डॉ. सुधाकर पठारे, पोलीस मुख्यालय उपआयुक्त