रेल्वेस्थानकाच्या आवारात फेरीवाल्यांचा शिरकाव, प्रवासी-नागरिक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 05:09 AM2018-12-24T05:09:46+5:302018-12-24T05:10:02+5:30
शहरातील पदपथ आणि रस्ते व्यापणाऱ्या फेरीवाल्यांनी आता चक्क रेल्वेस्थानकांच्या आवारात शिरकाव केला आहे.
नवी मुंबई : शहरातील पदपथ आणि रस्ते व्यापणाऱ्या फेरीवाल्यांनी आता चक्क रेल्वेस्थानकांच्या आवारात शिरकाव केला आहे. फेरीवाल्यांकडून स्थानकाच्या आतील भागात बसलेल्या बस्तानामुळे स्थानकाला मंडईचे रूप आले आहे. रेल्वेस्थानकात ये-जा करताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत असून, प्रवासी त्रस्त झाले आहेत. या प्रकाराकडे सिडकोचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई शहर वसविताना सिडकोने रेल्वेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भविष्यात वाढणाºया नागरिकांच्या गर्दीचा विचार करता सर्व सोई-सुविधांयुक्त रेल्वे स्थानके सिडकोने बांधली आहेत. शहरातील पदपथांवर आणि रस्त्यांवर मांडलेले बस्तान यामुळे नागरिकांना पदपथांवरून चालणे जिकिरीचे झाले आहे. त्यातच आता फेरीवाल्यांनी रेल्वेस्थानकांच्या आवारातदेखील शिरकाव करायला सुरुवात केली आहे. नेरुळ रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारावर त्यानंतर थेट स्थानकाच्या आतदेखील फेरीवाल्यांनी व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. नेरुळ रेल्वेस्थानकातून रेल्वेने प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने संध्याकाळी फेरीवाल्यांमुळे नागरिकांना रेल्वेस्थानकात ये-जा करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्थानकात बेकायदा फेरीवाल्यांची संख्या वाढल्याने रेल्वेस्थानकाला मंडईचे रूप आले आहे. स्थानकांच्या रक्षणासाठी सिडकोने सुरक्षारक्षक नेमले आहेत; परंतु सुरक्षारक्षकांना न जुमानता फेरीवाले बिनदिक्कतपणे व्यवसाय करीत आहेत. फेरीवाल्यांमुळे सुरक्षेचा मुद्दादेखील ऐरणीवर आला असून सिडको प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे प्रवासी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नेरु ळ रेल्वेस्थानकाच्या आवारात फेरीवाले मोठ्या प्रमाणावर वाढले असून, रेल्वे स्थानक आहे की मंडई, असा प्रश्न पडतो. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून सुरक्षेचा मुद्दादेखील निर्माण झाला आहे. सिडकोने या फेरीवाल्यांवर कारवाया करून यावर नियंत्रण मिळवावे.
- धनंजय खंडागळे, नागरिक