प्रत्येक गाडीची तपासणी, अपघातांना हुलकावणी; नवी मुंबई, वसईसह २० आरटीओत वाहन निरीक्षण-परीक्षण केंद्र
By नारायण जाधव | Published: May 11, 2023 05:05 AM2023-05-11T05:05:39+5:302023-05-11T05:05:56+5:30
या कार्यालयांवर ३६२ कोटी ५२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
नारायण जाधव
नवी मुंबई : रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी नवी मुंबई, वसई आरटीओ कार्यालयांसह राज्यातील २० आरटीओंच्या कार्यक्षेत्रात वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्र सुरू करण्यास गृह विभागाने मान्यता दिली आहे. या कार्यालयांवर ३६२ कोटी ५२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मालकीच्या, एसटी महामंडळाच्या जागांना त्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
केंद्रांमध्ये अहमदनगर, धुळे, जळगाव, मालेगाव, साांगली, अकलूज, गडचिरोली, कराड, उस्मानाबाद, वर्धा, भंडारा, गोंदिया, हिंगोली, पेण, यवतमाळ, जालना, सिंधुदुर्ग, नागपूर (पूर्व) यांचाही समावेश आहे.
फिटनेस चाचणीवरून मुंबई उच्च न्यायालयाने आरटीओ अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्यानंतर राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने राज्यात ही वाहन निरीक्षण-परीक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.
यांची होते तपासणी
गाडीचे लाइट, ब्रेक, टायर, इंजिन आदींची संपूर्ण तपासणी होते. टेस्ट ट्रॅकवर गाडी चालवून पाहिली जाते. त्यानंतरच आरटीओकडून फिटनेस प्रमाणपत्र देण्यात येते.
दरवर्षी रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या मोठी असून गाडी चांगल्या स्थितीत नसणे हेदेखील अपघाताचे कारण ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने गाड्यांची फिटनेस चाचणी काटेकोरपणे करणे महत्त्वपूर्ण असते. यामुळे स्वयंचलित यंत्रणेमार्फत तपासणी या वाहन निरीक्षण व परीक्षण केंद्रांत करणे सोपे होईल.