आयुक्तांनी केली स्वच्छतेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 01:19 AM2017-12-08T01:19:35+5:302017-12-08T01:19:44+5:30
महानगरपालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी स्वच्छतेविषयक विविध मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत विद्यार्थी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती, नागरिकांच्या सहभागाने परिसराची स्वच्छता असे उपक्रम राबविले जात आहे.
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी स्वच्छतेविषयक विविध मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत विद्यार्थी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती, नागरिकांच्या सहभागाने परिसराची स्वच्छता असे उपक्रम राबविले जात आहे. शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करून तेथील नागरिकांशी चर्चा केली.
वाशी आणि सी.बी.डी. बेलापूर रेल्वे स्टेशन आणि परिसरातील स्वच्छतेची महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने मौलिक सूचना दिल्या तसेच वाशी येथील महापालिका सार्वजनिक रुग्णालयास अचानक भेट देऊन तेथील कामकाजाची व रुग्णसेवा सुविधांची पाहणी केली. तुर्भे विभागाची पाहणी करताना आयुक्तांनी हनुमाननगर येथील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची पाहणी केली व तेथील आवश्यक दुरुस्ती, साफसफाई, परिसर सुधारणा याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
वाशी रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण
या पाहणी दौºयात आयुक्तांनी वाशी रेल्वे स्टेशनला भेट दिली व त्यावरील इन्फोटेक पार्कमधील साफसफाई करणारी संस्था व्हीआरएससीसीएल यांचेशी चर्चा करून त्यांना नियमित स्वच्छतेविषयी व कचºयाच्या ओला व सुका वर्गीकरणाविषयी सूचना केल्या. स्टेशनवर ठरावीक अंतरावर ओला व सुका कचºयासाठी लहान आकाराच्या स्वतंत्र कचराकुंड्या लावणेबाबत रेल्वे प्रशासनालाही यावेळी सूचना देण्यात आल्या. वाशी रेल्वे स्टेशनबाहेरील ५०० मीटरपर्यंतच्या परिसराची साफसफाई तसेच सुशोभीकरण करणेबाबत निर्देशित केले.
स्वच्छतागृहांची पाहणी
रेल्वे स्टेशनमध्ये जाण्या-येण्यासाठी रघुलीला मॉलकडील बाजूने असलेली दोन्ही प्रवेशव्दारे बंद करण्याच्याही सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या. रघुलीला मॉलसमोरील मोकळ्या जागेत कचरा टाकला जातो व संपूर्ण परिसर अस्वच्छ दिसतो याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत त्याठिकाणी कचरा टाकला जाऊ नये याकरिता तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देत तेथे फलक लावण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. स्टेशनमधील शौचालयांचीही पाहणी केली व त्याठिकाणी नियमित स्वच्छता राहील याकडे विशेष लक्ष देण्याचे सूचित केले. वाशी बसडेपो येथील शी टॉयलेट तसेच इतर ठिकाणची ई-टॉयलेट नियमित कार्यान्वित राहण्यासाठी आवश्यक गोष्टींची त्वरित पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आली.