नवी मुंबई : पावसाळापूर्व कालावधीत शहरातील नालेसफाईचा आढावा घेण्यासाठी महापौर जयवंत सुतार यांच्याकडून पाहणी केली जात आहे. दिघ्यापासून सुरू झालेल्या दौऱ्यात गुरु वार, ६ जून रोजी बेलापूर विभागातील नाल्यांच्या साफसफाईची पाहणी करण्यात आली. या वेळी शहरात मान्सून काळात कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी शहरात नालेसफाईची कामे सुरू आहेत.
बेलापूर विभागातील सेक्टर आठ, आर्टिस्ट व्हिलेज नाला, रमाबाई आंबेडकरनगर नाला, सेक्टर ११ येथील फ्लॅप गेट, ठाणे-बेलापूर महामार्गालगतचे नाले, सेक्टर १५ व दिवाळा-शाहबाज येथील नाला तसेच सीवूडजवळील नाल्याची महापौरांनी पाहणी केली. काही नाल्यांमध्ये अभियांत्रिकी विभागामार्फत नाल्यांलगत भिंती बांधण्याचे काम सुरू असून नाल्याच्या पी.सी.सी.पर्यंत जेसीबीद्वारे मातीचा थर काढण्याच्या कामाची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी पूर्ण माती बाहेर काढून घेण्याकडे लक्ष देण्याचे महापौरांनी सूचित केले. त्याचप्रमाणे फ्लॅप गेट सुस्थितीत राहतील याची विशेष काळजी घेण्याचे निर्देशदेखील देण्यात आले. सेक्टर २५ येथील दारावे सीवूड येथील नाल्याची सफाई करताना कांदळवनाची अडचण येते व त्यामुळे भरतीच्या वेळी पाणी रस्त्यावर येते हे लक्षात घेऊन यावरील उपाययोजना करण्यासाठी वनविभागाची परवानगी मिळावी, या दृष्टीने पाणी रस्त्यावर येते, अशा वेळची छायाचित्रे वनविभागाकडे सादर करून त्यांच्या परवानगीसाठी पाठपुरावा करावा, तसेच नाल्यांतील काढलेला गाळ थोडासा सुकल्यानंतर तो लगेच उचलण्यात यावा, अशा विविध सूचना करण्यात आल्या. याप्रसंगी नगरसेविका सुरेखा नरबागे, परिवहन सदस्य साबू डॅनियल, विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, कार्यकारी अभियंता अजय संख्ये, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे आदी अधिकारी उपस्थित होते.