खालापूर : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर जाहिरातींच्या फलकांसाठी वृक्षतोड करत असताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वृक्षतोड करणाऱ्या अमजद कासिम खान (२२) व केयुर पोपटभाई पटेल (२५, रा. अंधेरी) यांना अटक केली असली तरी यातील सूत्रधाराला अटक करण्याची मागणी होत आहे.मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वृक्षतोडीत आयआरबी, डेल्टाफोर्स व राज्य रस्ते विकास महामंडळाचाही सहभाग असल्याचा आरोप होत आहे. या अगोदरही अनेकदा अशा प्रकारे झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्याबाबतच्या तक्र ारीही वनविभाग व पोलिसांकडे दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र या प्रकरणात अद्याप कुणावरही कारवाई झाली नव्हती. रविवारी पहाटे डेल्टाफोर्सचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना टेंभरी गावच्या हद्दीत दोन इसम वृक्षतोड करीत असल्याचे विजेंद्र सावंत या कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत दोघांना हटकले असता दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी सावंत यांनी पोलिसांना बोलावून अमजद कासिम खान (२२) व केयुर पोपटभाई पटेल (२५) या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे याआधी झालेल्या वृक्षतोडीचा तपासही लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. (वार्ताहर)
एक्स्प्रेस वेवर वृक्षतोड करणारे अटकेत
By admin | Published: July 13, 2015 2:52 AM