कलामांच्या प्रेरणेतून ‘सायन्स पार्क’
By admin | Published: July 28, 2015 10:46 PM2015-07-28T22:46:18+5:302015-07-28T22:46:18+5:30
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कामापासून प्रेरणा घेवून महापालिकेने शहरात सायन्स पार्क उभारण्याचे निश्चित केले आहे. यासाठी कलामांशी चर्चाही करण्यात आली होती.
नवी मुंबई : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कामापासून प्रेरणा घेवून महापालिकेने शहरात सायन्स पार्क उभारण्याचे निश्चित केले आहे. यासाठी कलामांशी चर्चाही करण्यात आली होती. वंडर्स पार्कमध्ये शिल्लक असणाऱ्या भूखंडावर हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे.
नवी मुंबई हे सुनियोजित शहर आहे. सिडकोने शहराची रचना करताना शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा व इतर कामांसाठी प्रत्येक नोडमध्ये भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. महापालिकेनेही मागील दोन दशकांमध्ये अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभे केले आहेत. अत्याधुनिक क्षेपणभूमी, अत्याधुनिक मलनिस्सारण केंद्र, स्वत:च्या मालकीचे धरण, भव्य मुख्यालय व शहराचा नावलौकिक वाढविणारे अनेक प्रकल्प उभारले आहेत. पालिका भविष्यातही अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारणार असून त्यामध्ये नेरूळमधील सायन्स पार्कचा समावेश आहे. वंडर्स पार्कचा एक
भाग यासाठी राखून ठेवण्यात आला आहे.
शहरातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी, शहरातून चांगले शास्त्रज्ञ घडावेत यासाठी हा प्रकल्प उभा करण्याचे निश्चित केले आहे. संजीव नाईक खासदार असताना त्यांनी यासाठी माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची भेट घेवून ही संकल्पना सांगितली होती. त्यांनीही याचे स्वागत करून सायन्स पार्क कसे असावे याविषयी अनिल काकोडकर व रघुनाथ माशेलकर यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले होते.
महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी सायन्स पार्कची संकल्पना कलाम यांच्या कार्यामुळे सुचली होती. हा प्रकल्प उभारल्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण करण्यात येणार होते. परंतु अद्याप प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आलेले नाही. भविष्यात हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याला कलाम यांचेच नाव देण्याची प्रतिक्रिया विविध मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे कर्तृत्व देशवासीयांना सदैव प्रेरणा देत राहील. नवी मुंबईमध्ये होऊ घातलेल्या सायन्स पार्कलाही त्यांचे नाव देण्यात येईल. दर्जेदार सायन्स पार्क उभारण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
- सुधाकर सोनावणे, महापौर
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याची माहिती व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी सायन्स पार्क उभारण्याचे निश्चित केले आहे. खासदार असताना कलाम यांच्याशी याविषयी चर्चाही केली होती. लवकरात लवकर सायन्स पार्क उभारून त्याला कलाम यांचे नाव द्यावे, अशी सूचना पालिकेस करणार आहे.
- संजीव नाईक, माजी खासदार