आमच्याकडून वर्गणी घेवून उद्यानात व्यायाम साहित्य बसवा; महानगरपालिकेविरोधात अनोखे आंदोलन

By नामदेव मोरे | Published: October 11, 2023 04:25 PM2023-10-11T16:25:26+5:302023-10-11T16:25:45+5:30

सानपाडामधील नागरिक झाले आक्रमक, प्रशासनाचा निषेध

install exercise equipment in the park by subscribing to us; A unique movement against the Municipal Corporation | आमच्याकडून वर्गणी घेवून उद्यानात व्यायाम साहित्य बसवा; महानगरपालिकेविरोधात अनोखे आंदोलन

आमच्याकडून वर्गणी घेवून उद्यानात व्यायाम साहित्य बसवा; महानगरपालिकेविरोधात अनोखे आंदोलन

नवी मुंबई : सानपाडा मधील सिताराम मास्तर उद्यानातील व्यायामाचे साहित्य एक वर्षापुर्वीच खराब झाले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी बुधवारी दुरूस्तीसाठी लोकवर्गणी काढली. आमच्याकडून वर्गणी घ्या व व्यायामाचे साहित्य नवीन बसवा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. या अनोख्या आंदोलनाची प्रशासनाने तत्काळ दखल घेवून भेट देवून उद्यानाची पाहणी केली.

नवी मुंबई महानगरपालिकेने सानपाडा सेक्टर ७ मध्ये सिताराम मास्तर उद्यानाची उभारणी केली आहे. परिसरातील सर्वात मोठे उद्यान असल्यामुळे येथे सकाळी व सायंकाळी हजारो नागरिक चालण्याचा व धावण्याचा व्यायाम करण्यासाठी येतात. याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र असल्यामुळे ज्येष्ठांचीही उद्यानामधील उपस्थिती लक्षणीस असते. महानगरपालिकेने येथे खुली व्यायामशाळा तयार केली होती. पण एक वर्षापुर्वीच सर्व व्यायाम साहित्य नादुस्त झाले आहे. व्यायामाचे साहित्य नवीन बसविण्याची मागणी एक वर्षापासून परिसरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक करत आहेत. पण प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी बुधवारी पहाटे लोकवर्गणी काढून व्यायाम साहित्य बसविण्याचा निर्णय घेतला.

सानपाडामधील रहिवाशांनी सकाळी एक तासात २० हजार रुपये लोकवर्गणी गोळा केली. या अनोख्या आंदोलनाची माहिती मिळताच उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर यांनी तत्काळ उद्यानाला भेट दिली. रहवाशांनी त्यांना मागणीचे निवेदन दिले व लाेकवर्णतील जमा झालेली रक्कम त्यांना देण्याचा प्रयत्न केला. परंतु उपायुक्तांनी ही रक्कम घेण्यास नकार दिला व लवकरच व्यायाम साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख मिलिंद सुर्याराव, महानगर प्रमुख सोमनाथ वास्कर, अजय पवार, बाबाजी इंदोरे, मारूती विश्वासराव, रणवीर पाटील, अशोक संकपाळ, विकास वाघुले, नरेश देशमुख, शंकर चिकने, विलास देशमुख, परशुराम शिरवळ, श्यामराव मोरे व इतर नागरिक उपस्थित होते.

दोन आठवड्यात समस्या सोडविणार

सिताराम मास्तर उद्यानामध्ये पुढील दोन आठवड्यात व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर यांनी दिले आहे. या आश्वासनाची पुर्तता झाली नाही तर पुन्हा वेगळ्या पद्धतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्धार रहिवाशांनी केली आहे.

Web Title: install exercise equipment in the park by subscribing to us; A unique movement against the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.