लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल महानगरपालिकेत पन्नास टक्के जागा महिलांकरिता राखीव आहेत. इच्छुक उमेदवारांमध्ये पुरुषांची संख्या जास्त होती. त्यामुळे काहींना तिकीट न देता सौभाग्यवतींना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. पनवेल महापालिकेतील ७८ जागांपैकी ३९ जागांवर महिला उमेदवार द्याव्या लागणार आहेत. ऐनवेळी नवीन चेहरा दिला तर मतदारांना अपील होईल का, त्याचा नेमका काय परिणाम होईल याबाबतही प्रमुख पक्षांनी विचारमंथन केले. प्रभाग क्र मांक १७ मध्ये विजय म्हात्रे यांच्या पत्नीला शेकापकडून उमेदवारीमिळाली. १६ मध्ये प्रभाकर कांबळे आणि किशोर चौतमोल यांना आपल्या सौभाग्यवतीला अनुक्र मे शेकाप आणि भाजपाकडून उमेदवारी घ्यावी लागली. प्रभाग १८ चा विचार केला तर संतोष उरणकर यांना आपल्या होम मिनिस्टर भारती यांना भाजपाकडून उमेदवारी घ्यावी लागली. याच ठिकाणी डॉ. विलास मोहकर यांच्या पत्नी सुरेखा मोहकर शेकापकडून निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्र मांक १५ मध्ये श्रीहरी मिसाळ यांना उमेदवारी हवी होती, परंतु सर्वसाधारण एकच जागा असल्याने सविता मिसाळ यांना शिवसेनेकडून सर्वसाधारण महिला राखीव असलेल्या जागेवर तिकीट घेतले आहे. गणेश पाटील यांनी याच प्रभागातून बंडाचे निशान फडकविण्याचा इशारा दिला होता, परंतु शेवटी त्यांनी पत्नी कुसुम पाटील यांना निवडणुकीत उभे केले आहे. प्रभाग ८ मध्ये बबन बरगजे यांनी भाजपाकडून उमेदवारीमागितली होती, परंतु पक्षाने त्यांची पत्नी बायजा यांना संधी दिली आहे. याच प्रभागातून रोडपाली कळंबोली विकास आघाडीतून सचिन कुंभार इच्छुक होते, परंतु आरक्षण प्रतिकूल असल्याने त्यांच्या पत्नी ललिता कुंभार यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय अॅड. धर्मनाथ गोंधळी यांना उमेदवारी हवी होती, परंतु आघाडीने त्यांच्या होममिनिस्टर शोभना यांना संधी दिली आहे. प्रभाग सातमध्ये भाजपाकडून रवींद्र पाटील यांच्या पत्नीला कमळाच्या चिन्हावर लढण्याकरिता पक्षाने ए.बी. फॉर्म दिला. खारघरमधून शेकापचे अजित अडसुळे यांच्या पत्नी उषा यांना प्रभाग ६मधून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. या शेकापकडून महापौरपदाच्या उमेदवार मानल्या जातात. भाजपाचे स्थानिक नेते किरण पाटील यांच्या पत्नी नेत्रा यांना प्रभाग ४मधून संधी दिली गेली आहे. प्रभाग १२ येथे शेकापचे राजेश म्हात्रे आणि सखाराम पाटील यांच्या गृहमंत्री अनुक्र मे सुवर्णा आणि ललिता यांच्या हातात कपबशी देण्यात आली आहे. प्रभाग नऊमधून माजी सभापती चंद्रकला शेळके यांना संधी देण्यात आली आहे. त्या शेकापचे नेते शशिकांत शेळके यांच्या पत्नी आहेत. याच पक्षाचे प्रकाश म्हात्रे यांच्या सौभाग्यवती माजी जिल्हा परिषद सदस्य प्रज्योती म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
श्रीऐवजी सौभाग्यवतींना संधी
By admin | Published: May 09, 2017 1:32 AM