VIDEO: माणुसकी मेली ! खड्ड्यामुळे क्रेनखाली येऊन तरुणीचा मृत्यू, मदत करण्याऐवजी लोकांनी काढला पळ
By शिवराज यादव | Published: October 16, 2017 01:06 PM2017-10-16T13:06:16+5:302017-10-16T13:47:38+5:30
प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नवी मुंबईतील एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नवी मुंबईत घडली आहे. खारघर सेक्टरमध्ये हा अपघात झाला.
नवी मुंबई - प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नवी मुंबईतील एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नवी मुंबईत घडली आहे. खारघर सेक्टरमध्ये हा अपघात झाला. तरुणी स्कुटीवरुन जात असताना, खड्ड्यामुळे तोल जाऊन ती रस्त्यावर पडली. यावेळी मागून येणा-या क्रेनने तिला चिरडलं आणि तसाच निघून गेला. क्रेनच्या चाकाखाली आल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून यामध्ये तरुणीचा मृतदेह रस्त्यावर पडला असतानाही लोक मदत करण्याऐवजी बाजूने रस्ता काढत निघून जात असल्याचं दिसत आहे.
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचं नाव शिल्पा पुरी असं आहे. खारघरमधील सेक्टर 12 मध्ये ती राहत होती. सीसीटीव्हीत दिसत असल्याप्रमाणे रस्त्यावरुन जात असताना, खड्डा आल्याने तिचा तोल गेला आणि ती रस्त्यावर पडली. यावेळी तिच्या मागून येणा-या क्रेनच्या ड्रायव्हरला काही कळण्याआधी शिल्पा चाकाखाली आली होती. शिल्पाने हेल्मेट घातलं होतं. पण क्रेनच्या वजनामुळे त्याचा काहीच फायदा झाला नाही. तिचा जागीच मृत्यू झाला. क्रेन चालकाने अपघात झाला असतानाही तिथे थांबणं महत्वाचं समजलं नाही आणि पळ काढला. सीसीटीव्हीत क्रेन निघून जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
शिल्पाचा मृतदेह रस्त्यावर पडला असतानाही कोणीही मदतीला येण्याची तसदी घेतली नाही. तिच्या मागे जाणा-या एका बाईकवरील तरुणांनी तर बाजूने रस्ता काढत पळ काढला. याशिवाय तेथून जाणा-या गाड्याही मृतदेह पाहून निघून जात असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. त्यामधील एकाही व्यक्तीला थांबून पोलिसांना किंवा अॅम्ब्युलन्सला फोन करावा असं वाटलं नाही. अखेर प्रशासनाचा गलथानपणा आणि हरवलेल्या माणुसकीमुळे शिल्पाचा मृत्यू झाला असंच म्हणावं लागेल.
या घटनेमुळे नवी मुंबईतल्या रस्त्याच्या दुरवस्थेचं वास्तवही समोर आलं आहे. यापूर्वीही नवी मुंबईत खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सायन-पनवेल महामार्गावर खड्ड्यांमुळे संतोष शिंदे या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.