‘नैना’ क्षेत्राऐवजी महानगरपालिकेत समाविष्ट करा
By admin | Published: January 18, 2016 02:10 AM2016-01-18T02:10:18+5:302016-01-18T02:10:18+5:30
‘नैना’ क्षेत्रबाधित गावातील ग्रामस्थांनी नैना प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. या भागाचा नियोजनबध्द विकास करायचा असेल तर त्या बदल्यात आम्हाला महानगरपालिकेत
पनवेल : ‘नैना’ क्षेत्रबाधित गावातील ग्रामस्थांनी नैना प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. या भागाचा नियोजनबध्द विकास करायचा असेल तर त्या बदल्यात आम्हाला महानगरपालिकेत समाविष्ट करून घ्या, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. याकरिता या भागातील ग्रामपंचायतीत ठराव संमत करणार आहे. यामुळे नैना प्रकल्पासमोर आणखी आव्हान निर्माण झाले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर आजूबाजूच्या परिसरातही नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे केवळ बिनशेती त्याचबरोबर नगररचना विभागाच्या परवानगीबरोबर सिडकोकडूनही बांधकामास परवानगी घेणे बंधनकारक आहे.
नैना क्षेत्रांतर्गत होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार या ठिकाणी काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना वेगवेगळ्या प्रकारचे १५ ते २० नाहरकत दाखले घेणे बंधनकारक आहे. ही सर्व कागदपत्रे जमा करताना नाकीनऊ येतात. याशिवाय नैना क्षेत्रातील विकास शुल्क प्रतिगुंठा तीन लाख केल्याशिवाय परवानगी दिली जात नाही. जमीन मालकांना दिला जाणाऱ्या मोबदल्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली जात नसल्याचे याठिकाणी शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे नामदेव फडके यांचे म्हणणे आहे.
नैना क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. या विरोधात एक चळवळ उभी करण्यात येत असून त्यात गावातील लोकांनी सहभाग नोंदवला आहे. माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील, पी.बी. सावंत, आमदार विवेक पंडित, उल्का महाजन, सुरेखा दळवी, अंजली दमानीया यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. (वार्ताहर)