लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सीवूड सेक्टर २७ येथील लोटस तलाव परिसरात सिडकोने डेब्रिज टाकले असून, या ठिकाणी असलेल्या पाणथळ जागेवरदेखील डेब्रीज टाकल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी डेब्रिज टाकण्याच्या कामाला स्थगिती दिली होती. शुक्रवारी १२ मार्च रोजी तहसीलदार युवराज बांगर यांनी घटनास्थळाची पाहणी करत पाणथळ जागेवर टाकलेले डेब्रिज उचलण्याचे निर्देश सिडकोला दिले असून, कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सीवूड सेक्टर २७ येथील भूखंड क्रमांक-२ हा सिडकोच्या मालकीच्या असून, त्यावर डेब्रिज टाकण्याबाबत सिडकोने महानगरपालिकेकडे रितसर परवानगी मागितली होती. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत याबाबतची परवानगी देताना पाणथळ जागेमध्ये डेब्रिज टाकू नये या शर्तीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली होती. लोट्स जलाशयात डेब्रिज टाकले जात असल्याच्या तक्रारी सोशल मीडियावरून महापालिका आयुक्त बांगर यांस प्राप्त झाल्या होत्या. त्या आनुषंगाने आयुक्तांनी त्वरित सदर जागेला प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. यावेळी सदर पाणथळ जागेच्या बाजूला डेब्रिज टाकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सध्या डेब्रिज टाकण्याची कार्यवाही तत्काळ थांबविण्याचे आदेश देण्यात आले होते. शुक्रवारी तहसीलदार बांगर यांनी पाहणी केली असून, पाणथळ जागेवर टाकलेले डेब्रिज उचलण्याच्या सूचना सिडकोला देण्यात आल्या आहेत.
डेब्रिजच्या बाबतीत तक्रारी प्राप्त झाल्याने विभागीय आयुक्तांनी पाहणी करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. सिडकोने भराव केलेला निदर्शनास आला आहे. सिडकोला टाकलेले डेब्रिज काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, येत्या काही दिवसांत या संदर्भात कारवाई केली जाईल. - युवराज बांगर (तहसीलदार)