नवी मुंबई : शहरातील नागरिकांना पाळीव प्राण्यांच्या उपचारासाठी शहराबाहेर जावे लागत होते. नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून जुईनगर सेक्टर २४ येथे पशुवैद्यकीय रु ग्णालय बांधण्याचे काम सुरू आहे. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी या सुरू असलेल्या कामाची शुक्र वारी १४ जून रोजी पाहणी केली. या वेळी गुणवत्तापूर्ण काम करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
नवी मुंबई शहरात पाळीव प्राण्यांच्या उपचारासाठी महापालिकेच्या माध्यमातून सुविधा नसल्याने नागरिकांना मुंबईसारख्या शहरात जावे लागत होते. त्यामुळे लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्याकडून शहरात पशुवैद्यकीय रु ग्णालय असण्याबाबत सातत्याने महापालिकेकडे मागणी करण्यात येत होती. या अनुषंगाने महापालिकेच्या माध्यमातून जुईनगर येथे पशुवैद्यकीय रु ग्णालय बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये तळमजला अधिक दोन मजले अशी ७९१५ चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळात वैद्यकीय रु ग्णालयाची इमारत उभी करण्यात येत असून याकरिता ४ कोटी ८४ लाख इतका खर्च अपेक्षित आहे. महापालिका निर्माण करीत असलेल्या या सुविधेमुळे पाळीव प्राणी पाळणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. सदर रु ग्णालय इमारतीच्या कामाची पाहणी करून आयुक्तांनी गुणवत्तापूर्ण काम व्हावे व ते विहित कालावधीत पूर्ण व्हावे यादृष्टीने दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना केल्या. या पाहणी दौºयात शहर अभियंता सुरेंद्र पाटील व सुभाष सोनावणे, गजानन पुरी उपस्थित होते.