नवी मुंबई : वाशी येथील फादर अग्नेल महाविद्यालयाच्या तरणतलावात बुडून विद्यार्थ्याच्या मृत्यूची घटना घडली होती. याप्रकरणी पोहण्याचे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक व लाईफगार्ड यांच्यावर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयूर डमाळे (१७) असे दुर्घटनेत मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो नेरूळचा राहणारा असून फादर अग्नेल येथील तरण तलावात पोहण्याचे प्रशिक्षण घेत होता. १३ एप्रिलला दुपारी तो पोहण्याचा सराव करत असताना बुडाला होता. यावेळी त्याला पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.
या घटनेला प्रशिक्षक जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांकडून होत होता. याबाबत गुरुवारी त्यांनी वाशी पोलिसांकडे तक्रार केली असता चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रशिक्षक लक्ष्मणसिंग ठाकूर, लाईफगार्ड आकाश देवाडे, सुराजकुमार चौधरी, ओमगोविंद यादव व सागर शिवशरण यांचा समावेश आहे. मयूर हा पोहण्यासाठी शिकत असतानाही संबंधितांचे त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. यामुळे मयूरचा बुडून मृत्यू झाल्याचा ठपका प्रशिक्षक व लाईफगार्ड यांच्यावर ठेवण्यात आला आहे.