नवी मुंबई - पत्नी व वडिलांचा अपमान होत असल्याच्या रागातून शेजाऱ्याची हत्या केल्याची घटना पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. मोरबे गाव परिसरात एक मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी माग काढत उत्तर प्रदेशमधून आरोपीला अटक केली आहे.
वावंजे येथून बेपत्ता झालेले याकूब खान (६०) यांचा मोरबे गाव परिसरात २९ ऑक्टोबरला मृतदेह आढळला होता. दोन दिवस अगोदर ते हरवल्याची नोंद पनवेल तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. याकूब यांच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता वर्तवली जात होती. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ निरीक्षक उमेश गवळी यांनी सहायक निरीक्षक प्रवीण फडतरे, अजित कानगुडे, मानसिंग पाटील, रमेश शिंदे, अनिल पाटील, प्रशांत काटकर, सागर रसाळ, रूपेश पाटील आदींचे तपास पथक तयार केले. याकूब बेपत्ता झाले तेव्हापासूनचा मागोवा घेतला असता ते श्रीकांत तिवारी याच्यासोबत गेले असल्याचे समोर आले. तिवारी देखील घरी परत आलेला नसल्यामुळे उत्तर प्रदेशमधील त्याच्या मूळ गावी जाऊन पोलिसांनी पाळत ठेवली. मंगळवारी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली.
अशी केली हत्या- याकूब व श्रीकांत हे शेजारी असून, याकूब हा श्रीकांतची पत्नी व वडिलांचा सतत अपमान करायचा. यावरून त्याने याकूबला समज देखील दिली होती. त्यानंतरही तो कुटुंबाला अपमानित करत असल्याचा राग श्रीकांतच्या डोक्यात होता. २६ ऑक्टोबरला श्रीकांत हा याकूबला जमिनीच्या व्यवहाराच्या बहाण्याने मोरबे गावाकडे घेऊन गेला.- त्या ठिकाणी झालेल्या वादात श्रीकांतने त्याची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. यानंतर मृतदेह शेततळ्यात टाकून त्याने पळ काढला होता.